महाविकास आघाडीचा शेतकरी विरोधी चेहरा उघड

राज्यात शेतकरी हिताच्या योजना राबवायच्या नाहीत आणि आहे त्या योजनाही राजकारण करून बंद पाडत शेतकऱ्यांची कोंडी करण्याचा आघाडी सरकारचा कट उघड झाला आहे.

(प्रातिनिधिक छायाचित्र)

‘जलयुक्त शिवार’च्या अहवालावरून भाजपची टीका

नाशिक : विश्वासघाताने सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. लोकसहभागातून राबविलेल्या ‘जलयुक्त शिवार’ योजनेची यशस्वीता मोठी होती. राज्यात १३ लाख कामे झाली. यातील ५०० ते ७०० कामात त्रुटी आढळल्या. राज्य सरकारने नेमलेल्या समितीच्या अहवालावरून जलयुक्त योजनेमुळे शेतकऱ्यांचा फायदा झाल्याचे स्पष्ट झाल्याचे भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. जलसंधारण विभागानेच शेतकरी विरोधाचा सरकारी चेहरा उघड केल्याने या योजनेविषयी गैरसमज पसरविणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांची माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली.

राज्यात शेतकरी हिताच्या योजना राबवायच्या नाहीत आणि आहे त्या योजनाही राजकारण करून बंद पाडत शेतकऱ्यांची कोंडी करण्याचा आघाडी सरकारचा कट उघड झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राबविलेल्या जलयुक्त शिवार योजनेविरुद्ध कांगावा करून शेतकऱ्यांना त्या योजनेपासून परावृत्त करण्याचा आघाडी सरकारचा डाव अंगलट आल्याचे उपाध्ये म्हणाले.

राज्यातील जनतेची जीवन वाहिनी असलेल्या एसटी महामंडळासही सरकारने वेठीस धरले असून महामंडळास तोट्यात ढकलून एसटीच्या खासगीकरणाचा डाव नाही ना? अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली. एसीबीच्या कारवाईबाबतच्या प्रश्नावरून त्यांनी नबाब मलीक यांच्यावर टीकास्त्र सोडले. देशात तुकडे तुकडे टोळ्या आहेत. ज्या केवळ आरोप करतात. ड्रग्स माफियांविरुध्द मोहीम चालवायची की नाही, अधिकारी हिंदू की मुस्लिम यात काय अर्थ आहे, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. शिवसेनेला अंमली पदार्थ विरोधात मोहीम हवी की नको हे त्यांनी स्पष्ट करावे, असे आव्हान उपाध्ये यांनी दिले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नाशिक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mahavikas aghadi anti farmer face exposed bjp criticism akp

Next Story
नाशिकच्या गुंडास धुळ्यात अटक
ताज्या बातम्या