धुळे : धुळे जिल्ह्यातील आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. शिरपूर नगर परिषदेचे भाजपचे माजी नगरसेवक हेमंत पाटील यांच्यासह पाच माजी नगरसेवकांनी शिवसेना (एकनाथ शिंदे गट) मध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे प्रामुख्याने शिरपूर तालुक्यावर एकहाती सत्ता ठेवणारे माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांच्या गटात खळबळ उडाली आहे.

मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आणि शिवसेना सचिव राम रेपाळे यांच्या माध्यमातून तसेच जिल्हाप्रमुख सतिष महाले यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश सोहळा पार पडला. भाजपाचे शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक हेमंत पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सभापती वसंत पावरा, माजी नगरसेवक राजेंद्र गिरासे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे माजी उपाध्यक्ष हेमराज राजपूत, भाजपा युवा मोर्चाचे माजी शहराध्यक्ष विक्की चौधरी, शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रसाद पाटील आणि कल्पेशसिंह राजपूत आदी अनेकांनी शिंदे गटात प्रवेश करून शिरपूर भाजपला जोरदार धक्का दिला आहे.

या घडामोडीनंतर शिरपूर शहरातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. तालुक्यावर माजी मंत्री तथा आमदार अमरिशभाई पटेल यांचे वर्चस्व असले, तरी त्यांचे नेतृत्व झुगारून भाजपमधील पदाधिकारी बाहेर पडून शिंदे गटात प्रवेशित झाल्याने शिरपूर शहर आणि तालुका भाजपच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. अनेक वर्षांपासून भाजपसोबत काम केलेले हे माजी नगरसेवक अचानक शिंदे गटात गेल्याने पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये आणि निष्ठावान पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे सूर उमटले आहेत.

भाजपच्या माजी नगरसेवकांचा शिंदे गटात झालेला प्रवेश हा अमरिशभाई पटेल यांच्या राजकीय बालेकिल्ल्यासाठी धोक्याचा इशारा मानला जात आहे. या घडामोडीमुळे स्थानिक पातळीवर भाजप नेतृत्वाला संघटनबांधणी आणि जनाधार टिकवण्यासाठी आणखी जोमाने प्रयत्न करावे लागणार आहेत. या ताज्या राजकीय हालचालीमुळे आगामी नगरपालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटात थेट सामना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शिरपूर शहरात दोन्ही गट आपल्या ताकदीची चाचणी घेण्यासाठी सज्ज होत असून हा सामना अत्यंत चुरशीचा ठरण्याची चिन्हे आहेत. शिंदे गटाने स्थानिक स्तरावर भाजपच्या नाराज नेत्यांना आपल्याकडे ओढून घेत आगामी निवडणुकांपूर्वी आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

एकंदरित, शिरपूर नगरपरिषदेतील माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश ही फक्त पक्षांतराची नव्हे तर आगामी निवडणुकीतील मोठ्या राजकीय लढाईची चाहूल असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.