मालेगाव : २००८ मध्ये मालेगावात झालेल्या बॉम्बस्फोटाच्या खटल्यात भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा यांच्यासह एकूण सात जणांची मुक्तता झाल्यानंतर मालेगाव शहर आणि तालुक्यातील हिंदुत्ववादी संघटनांना आनंदाचे भरते आले. या निकालानंतर साध्वी यांची छायाचित्रे घेऊन कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा केला.
बॉम्बस्फोटानंतर हिंदू समुदायातील व्यक्तींना अटक झाल्यानंतर हिंदू दहशतवाद हा शब्दप्रयोग पुढे आला होता. खटल्याचा निकाल लागताच हिंदुत्ववादी पक्ष आणि संघटनांच्या कार्यकर्त्यांची मालेगाव मोसम पूल भागात गर्दी झाली. या ठिकाणी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला, घोषणाबाजी केली. फटाक्यांची आतषबाजी करण्याचा प्रयत्न झाला. मात्र पोलिसांनी त्याला मज्जाव केला. त्यामुळे पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये वादही झाले. या निकालाचे स्वागत करताना हिंदू समाज कधी दहशतवादी कृत्य करू शकत नाही, हे न्यायालयात सिद्ध झाल्याची प्रतिक्रिया या मंडळींकडून व्यक्त झाली.
मागील अक्षय्यतृतीयेच्या दिवशी हिंदुत्ववादी संघटनांच्यावतीने मालेगाव येथे हिंदू संमेलन आयोजित करण्यात आले होते. संमेलनात साधी प्रज्ञा यांना प्रमुख वक्त्या म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. कायदा व सुव्यवस्थेचे कारण देऊन या संमेलनाला पोलिसांनी ऐनवेळी परवानगी नाकारली होती. त्या विरोधात आयोजकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. यामुळे हे संमेलन चांगलेच गाजले होते. न्यायालयाने सशर्त परवानगी दिल्यानंतर हे संमेलन पार पडले होते. संमेलनाला साध्वी प्रज्ञा या अनुपस्थित राहिल्या होत्या. मात्र दूरदृष्यप्रणालीद्वारे त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. त्यांनी तेव्हा मालेगाव बॉम्बस्फोट घटनेत आपल्याला गोवण्यात आल्याची सल व्यक्त केली होती. आपण लवकरच मालेगावला येऊ, अशी ग्वाहीदेखील दिली होती.
मुस्लिम समाजात नाराजी
बॉम्बस्फोटात बळी गेलेल्या व्यक्तींचे नातेवाईक तसेच संशयितांना शिक्षा व्हावी, यासाठी पाठपुरावा करणाऱ्या मुस्लिमधर्मीय संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये मात्र या निकालामुळे नाराजी निर्माण झाली. या निकालाविरोधात वरिष्ठ न्यायालयात अपील दाखल करावे, अशी प्रतिक्रिया त्यांच्याकडून व्यक्त करण्यात येत आहे.
फौजफाटा तैनात
दंगलीचे शहर म्हणून ओळख असलेल्या मालेगावात २००१ नंतर दंगल घडल्याचे एकही उदाहरण नाही. तसेच शहरात शांतता व सौहार्दाचे नवे पर्व सुरू झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र २००६ आणि २००८ मध्ये झालेल्या बाॅम्बस्फोटाच्या घटनांमुळे त्याला गालबोट लागले. २००६ मधील बॉम्बस्फोट प्रकणातील सर्व संशयितांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. त्यामुळे २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्या १७ वर्षानंतर लागणाऱ्या निकालाविषयी सर्वांनाच उत्कंठा होती. या निकालाच्या पार्श्वभूमीवर शहरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस प्रमुख बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली अपर अधीक्षक तेगबिरसिंग संधू व त्यांचे सहकारी प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवून आहेत. बॉम्बस्फोट झालेल्या भिकू चौक भागात पोलीस विशेष लक्ष ठेऊन आहेत. स्थानिक पोलिसांसह राज्य राखीव दलाच्या तुकड्या व शीघ्र कृती दलाचे जवान ठिकठिकाणी तैनात करण्यात आले आहेत.
२००८ मध्ये मालेगावात झालेल्या बॉम्बस्फोटाच्या खटल्यात भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा यांच्यासह एकूण सात जणांची मुक्तता झाल्यानंतर मालेगाव शहर आणि तालुक्यातील हिंदुत्ववादी संघटनांना आनंदाचे भरते आले.
२००८ मध्ये मालेगावात झालेल्या बॉम्बस्फोटाच्या खटल्यात साध्वी प्रज्ञा यांच्यासह एकूण सात जणांची मुक्तता झाल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांना आनंदाचे भरते आले.