संचालक मंडळाच्या निवडणुकीत कोणालाच स्पष्ट कौल न मिळाल्याने येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शुक्रवारी होणाऱ्या सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपच्या बाजूने कौल लागू नये यासाठी शिवसेना, काँग्रेसचे प्रसाद हिरे यांची साथ करणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तसे झाले तर भाजप आणि सेना-काँग्रेस या दोन्ही गटांकडे समान संख्याबळ होणार असल्याने सभापतीची माळ नेमक्या कोणाच्या गळ्यात पडणार याविषयी उत्कंठा निर्माण झाली आहे.
तब्बल १० वर्षांनंतर झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप, सेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी असा तिरंगी सामना रंगला होता. मतदारांनी कोणालाच स्पष्ट कौल दिला नाही. १८ पैकी भाजपला सर्वाधिक नऊ जागा मिळाल्या. त्याखालोखाल सेनेला आठ आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला एकमेव जागा मिळाली. या स्थितीत एकच जागा मिळाली असतानाही काँग्रेसचे संचालक प्रसाद हिरे यांच्या भूमिकेला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
भाजपतर्फे अद्वय हिरे हे सभापतीपदासाठी प्रबळ दावेदार असून काँग्रेसचे प्रसाद हिरे हे त्यांना समर्थन देतील अशी प्रारंभी अटकळ बांधली जात होती. त्यामुळे अद्वय हिरे यांचे काम सहज फत्ते होईल असाही अंदाज वर्तविण्यात येत होता. मात्र रविवारी पार पडलेल्या मजूर फेडरेशनच्या तालुका संचालक पदाच्या निवडणुकीत प्रसाद हिरे समर्थकांनी साथ दिल्यामुळे सेनेच्या नीलेश आहेर यांचा विजय झाला. सेना व प्रसाद हिरे यांची अचानक झालेली ही जवळीक बाजार समिती सभापतीची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन झाल्याची वंदता असून भाजपच्या अद्वय हिरे यांच्यासमोरील अडचणीत त्यामुळे भर पडली आहे.
आठ संचालकांच्या बळावर बाजार समिती सभापतीपद मिळणे अवघड असल्याचे लक्षात घेत सेनेने कोणत्याही परिस्थितीत भाजपकडे पद जाऊ नये यासाठी प्रसाद हिरे यांना साथ देण्याच्या बदल्यात मजूर फेडरेशनमध्ये त्यांची मदत घेऊन आपला विजय निश्चित करण्याची खेळी केल्याची चर्चा आहे. ही खेळी खरी असल्यास सभापतीपदासाठी भाजपचे अद्वय हिरे व काँग्रेसचे प्रसाद हिरे यांच्यात लढत होईल. तसेच या तडजोडीनुसार दोन्ही गटांमधील संख्याबळ लक्षात घेता प्रत्येकी नऊ अशी समसमान मते पडण्याची शक्यता असून त्यामुळे चिट्ठी पध्दतीने सभापती निवडण्याची प्रक्रिया होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. सभापतीपद कोणाकडे जाणार याविषयी अनिश्चितता निर्माण झाली आहे. या अटीतटीच्या स्थितीत खबरदारी म्हणून सेना व भाजप या दोन्ही गटांनी आपले नवनिर्वाचित सदस्य अज्ञातस्थळी हलविले आहेत. बाजार समिती सभागृहात शुक्रवारी दुपारी १२ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी गौतम बलसाने यांच्या अध्यक्षतेखाली सभापती निवडीसाठी विशेष बैठक होणार आहे.