मालेगाव : शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटल्याने विस्कळीत झालेला शहरातील पाणीपुरवठा २८ तास उलटल्यावरही सुरू होऊ शकला नाही. जलवाहिनी दुरुस्तीचे काम अद्याप सुरू असल्याने बंद पडलेला पाणीपुरवठा नेमका कधी सुरू होईल, याबद्दलची अनिश्चितता कायम आहे. यामुळे शहरवासीयांना पाणीटंचाईचा फटका सहन करावा लागत असून महापालिकेचा भोंगळ कारभार यानिमित्ताने पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. जलवाहिनी फुटल्यानंतर पाणीपुरवठा बंद पडल्यासंदर्भात लोकांना तात्काळ अवगत करणे आवश्यक असताना तब्बल १६ तास उलटल्यावर महापालिका प्रशासनाकडून पाणीपुरवठा बंद झाल्याबद्दल अधिकृतपणे कळविले गेले. यामुळे पाण्याच्या प्रतीक्षेत दिवसभर ताटकळत बसावे लागल्याने शहरवासीयांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

सायने जलशुद्धी केंद्रापासून शहरातील विविध जलकुंभांपर्यत पाणी पुरवठा करणारी एक मीटर व्यासाची जलवाहिनी मंगळवारी रात्री येथील नव्या बस स्थानक परिसरात अचानक फुटली. त्यामुळे उड्डाणपुलाजवळील रस्त्यावरुन मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून गेले. काही जागरूक नागरिकांनी महापालिका अधिकाऱ्यांना ही माहिती दिल्यावर जलवाहिनीद्वारा होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला तरी जलवाहिनीतील पाणी बराच वेळ वाहत राहिल्यामुळे तेथील रस्त्याला नदीचे स्वरूप आले होते.

यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली. तसेच संबंधित जलकुंभ भरणे शक्य न झाल्याने बुधवारी निर्धारित असलेल्या भागांमधील पाणीपुरवठा सकाळी नऊ वाजेपासून बंद ठेवावा लागला. जलवाहिनी दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले असले तरी,त्याला बराच वेळ लागत असून गुरुवारी दुपारपर्यंत ते पूर्ण होऊ शकलेले नाही. हे काम पूर्णत्वास येण्यासाठी अजून काही तासांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत पाणीपुरवठा नेमका कधी सुरू होईल, याविषयी निश्चित स्वरूपाची माहिती आताच्या घडीला देणे पालिका प्रशासनाला शक्य झाले नाही. त्यामुळे शहरवासीयांमध्ये पाणीपुरवठ्याविषयी अनिश्चितता व गोंधळाची स्थिती निर्माण झाली.

मंगळवारी रात्री ही जलवाहिनी फुटली. त्यामुळे बुधवारचा पाणीपुरवठा विस्कळीत वा बंद होणे, हे स्वाभाविक होते. मात्र महापालिकेकडून त्या संदर्भातील प्रसिद्धी पत्रक चक्क बुधवारी सायंकाळी प्रसारित केले गेले. त्यामुळे सकाळपासून पाणीपुरवठा होणाऱ्या भागातील अनभिज्ञ राहिलेले रहिवाशी पाण्यासाठी दिवसभर ताटकळत बसून राहिले. जलवाहिनी फुटल्याने पाणीपुरवठा बंद झाला असून दुरुस्तीचे काम झाल्यावर पाणीपुरवठा पूर्ववत होईल,असे १६ तास उलटल्यावर महापालिकेतर्फे दिल्या गेलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले गेले. त्यावरून पाण्यासारख्या अत्यावश्यक सेवेबद्दल पालिका प्रशासन किती जागृत व गंभीर आहे, हे अधोरेखित होत आहे.

महापालिका प्रशासन स्तरावर अशी स्थिती असताना काही राजकीय व्यक्ती आणि महापालिकेच्या काही कर्मचाऱ्यांकडून मात्र विस्कळीत झालेला पाणीपुरवठा एक दिवस विलंबाने सुरु केला जाईल, अशी माहिती सायंकाळी उशिरा समाज माध्यमांद्वारे प्रसारित केली गेली. त्यामुळे पाणीपुरवठा नेमका केव्हा सुरू होईल,या संदर्भातील संभ्रम आणखीन वाढला. शहराला आधीच दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. किमान एक दिवसाआड पाणीपुरवठा करावा, ही शहरवासीयांची अपेक्षा पालिका प्रशासनाला पूर्ण करता येत नाही. त्यात पाणीपुरवठ्यातील गोंधळाची स्थिती अशा रीतीने वारंवार समोर येत असल्याने पालिका प्रशासनाबद्दलचा लोकांमधील रोष वाढत असल्याचे दिसत आहे. सायंकाळपर्यंत दुरुस्तीचे हे काम पूर्ण झाल्यास निर्धारित वेळेच्या किमान ३६ तास विलंबाने पाणीपुरवठ्याचे नियोजन होण्याची शक्यता आहे.

मुख्य जलवाहिनी दुरुस्ती आणि पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. लोखंडी जलवाहिनीतील संपूर्ण पाणी निघाल्याशिवाय वेल्डिंगचे काम करणे शक्य झाले नाही. शिवाय पावसाचा देखील व्यत्यय येत आहे. सायंकाळपर्यंत हे काम पूर्ण होईल,अशी अपेक्षा आहे. – सचिन माळवाळ (उप अभियंता पाणीपुरवठा विभाग,मालेगाव महापालिका )

जलवाहिनीच्या देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे पाणीपुरवठा बंद झाल्याची समस्या उद्भवली की काय, असा संशय येतो. पाणीपुरवठा विस्कळीत होणे, ही बाब शहरवासीयांसाठी नवीन नाही‌. परंतु पालिका प्रशासनाकडून त्यासंदर्भात शहरवासीयांना किमानपक्षी जी पूर्वकल्पना देणे,आवश्यक असते,तशी तसदी का घेतली जात नाही, हाही मुख्य प्रश्न आहे. – ॲड शिशिर हिरे ( विशेष सरकारी वकील व सामाजिक कार्यकर्ते )