पंचवटी कारंजाजवळ सोमवारी रात्री एका व्यक्तीचा डोक्यात दगड टाकून खून करण्यात आला. झोपण्याच्या वादातून ही हत्या झाली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. पंचवटी कारंजाजवळील नरोत्तम भुवनजवळ इंदाणी ट्रॅव्हल्सच्या शेजारी हा प्रकार घडला. मंगळवारी सकाळी तो उघडकीस आला. साधारणत ५० ते ५५ वर्षीय व्यक्ती रात्री झोपण्यासाठी या परिसरास आला असावा. त्या ठिकाणी आधीच झोपलेल्या अज्ञात संशयितांमध्ये झोपण्याच्या कारणातून वाद झाले असावेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यातून संशयितांनी डोक्यात मोठा दगड टाकून त्याची हत्या केली असा अंदाज पोलिसांनी वर्तविला. मंगळवारी सकाळी पंचवटी कारंजा परिसरात नागरिकांची ये-जा सुरू झाल्यानंतर ही घटना निदर्शनास आली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही.

टवाळखोरांवर कारवाई सुरू

गुन्हेगारीचा आलेख उंचावत असल्याने पोलिसांनी नाकाबंदी, वाहन तपासणी बरोबर आता टवाळखोरांवर लक्ष केंद्रीत केले आहे. रात्री उशिरापर्यंत तरुणांचा ठिय्या असणारी डिसुजा कॉलनीतील चाय टपरी व आसपासची दुकाने असो वा, शरणपूर भागातील तिबेटीयन बाजारालगतचा चायनिज खाद्य पदार्थाची दुकाने असो अशा ठिकाणी अकस्मात धडकत पोलिसांनी कारवाईला सुरूवात केली आहे. कॉलेज रोडवरील डिसुझा कॉलनी तरुणांच्या गर्दीने दिवसभर फुललेला असतो. या मार्गावर दिवसरात्र तरुण-तरुणींचे जत्थे चहापान व सिगारेटचे झुरके सोडत असतात. काही जणांकडून रस्त्यालगत गाडीवर ठाण मांडून मद्यपानही केले जाते. या मार्गावर गंगापूर रोडच्या बाजुला मद्यविक्रीचे दुकान आहे. शिकवणी, हॉटेल्सची मोठी संख्या, चहाची टपरी आदींमुळे ठिकठिकाणी ठाण मांडणारे तरुणांचे जत्थे स्थानिकांसाठी डोकेदुखी ठरले आहेत. या ठिकाणी सोमवारी रात्री साडे आठच्या सुमारास पोलिसांचा ताफा धडकला. टवाळखोरांची धरपकड सुरू झाल्यानंतर पळापळ सुरू झाली. तिबेटीयन मार्केटलगतच्या चायनिज खाद्य पदार्थाच्या दुकानांचा मद्यपानासाठी वापर केला जातो. या ठिकाणी पोलिसांचा ताफा अकस्मात धडकला. सोमवारी रात्री गोदा पार्क, येवलेकर मळा, डिसुझा कॉलनी, तिबेटीयन मार्केट, पंचवटी, रामकुंड आदी भागांत कारवाई करीत ३५ ते ४० टवाळखोरांना ताब्यात घेण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man murdered in panchvati
First published on: 10-05-2017 at 01:28 IST