नाशिक : चल ग सखे मंगळागौर पुजू या…लाट बाई लाट, यासह अनेक गीतांची गुंफण…पैंजणाचा नाद…वाटी, लाटणं. ताटली, परात यांच्यासह मंगळागौरीच्या खेळात धरलेला ताल… मखमली कपड्यांसह दागिन्यांचा साज…अत्तराचा दरवळ, अशा मनमोहक वातावरणात आता मंगळागौरीचे खेळ रंगण्यास सुरूवात होईल. संस्कृतीचा वारसा पुढे नेणारे मंगळागौरीचे खेळ श्रावणाची रंगत तर वाढवितातच. शिवाय, बाजारपेठेत यानिमित्ताने मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढालही होते.
श्रावणात दर मंगळवारी नवविवाहित महिलांसाठी होणारी मंगळागौरीची पूजा ही सौभाग्य वृध्दीसाठी, मांगल्यासाठी होते. सख्यांना बोलवत नवविवाहितेची कुजबुज चालते. सासु-सुनेच्या नात्यातील रुसवा, नणंद-भावजयीमधील खट्याळपणा, यासह नात्यांची अलवार वीण अधिक गुंफणारी मंगळागौर. काळ बदलला तरी आजही मंगळागौरीला विशेष महत्व आहे. मागील काही वर्षात मंगळागौरीच्या खेळात व्यावसायिकता आली आहे. वेगवेगळे गट बोलावून मंगळागौरीचे खेळ खेळले जातात. मंगळागौरीच्या खेळात तसेच या दिवशी आपण विशेष दिसावे, यासाठी महिलांची धडपड असते. खेळ खेळणाऱ्या महिलांच्या समूहाकडून तयार नऊवार शिवण्याकडे कल वाढला आहे. बऱ्याचदा नऊवार साडीत मंगळागौरीचे खेळ खेळतांना नेसलेल्या साडीचा अडथळा होतो. त्यासाठी तयार साडी चांगला पर्याय असतो. नऊवार साडीला आतून लेगीन, सुती अस्तर असल्याने ही तयार साडी परिधान करुन बिनधास्तपणे खेळ खेळले जातात.
आपआपल्या आर्थिक क्षमतांचा विचार करत नऊवार साडीचा पोत बघत खरेदी होते. नेसण्याचा गोंधळ पाहता मस्तानी, ब्राह्मणी घोळ, पेशवाई यापध्दतीने शिवलेल्या साड्यांना मागणी आहे. याविषयी देवाजचे दुर्गेश खैरनार यांनी माहिती दिली. मंगळागौरीचे खेळ खेळणाऱ्या समूहाकडून आषाढाच्या पहिल्या दिवसापासून साडी शिवण्याकरिता नोंदणी केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. रुपये ७५० पासून पुढे साड्या उपलब्ध असून साडी शिलाईसह ९००, ब्लाऊज, त्यावर शोभेल असे शेले २५० रुपयांपासून पुढे आहे. महिलांकडून तयार नऊवारीला पसंती असून यामध्ये पेशवाई, ब्राह्मण घोळ नऊवार साडीला मागणी आहे. महु सिल्क, पेशवाई सिल्क, बनारस सिल्क, बेळगाव सिल्क असे विविध पर्याय आहेत. विशेष म्हणजे या नऊवार ठेवण्यासाठी ५० इंचीचे हँडल असलेली पिशवी दिली जाते. त्यामध्ये तयार साडी ठेवल्याने साडी चुरगळली जात नाही. याशिवाय नऊवार साडीवर घालण्यासाठी पारंपरिक ठुशी, चपलहार, लक्ष्मीहार, पोहेहार, चिंचपेटी असे विविध पर्याय मोत्यासह अन्य धातुंच्या प्रकारात भाडे तसेच विकत उपलब्ध आहेत. पूजेचे हे क्षण लक्षात राहण्यासाठी छायाचित्रकार, व्हिडिओ चित्रण यालाही मागणी वाढली आहे. पूजेचे सामान, महिलांना देण्यासाठी वाण, या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी वाढत आहे.
पुरूषांसाठी सोवळ्याचा साज
पूजेसाठी पुरूषांकडून सोवळे शिवण्यात येते. त्यात सुती, बेंगलोर सिल्क, पैठणी काठ, सिंपल मोर पैठणी काठाचे साेवळे बाजारात उपलब्ध आहे. या सोवळ्यावर बाराबंदी, तीन बटणाची बंदीसह कुर्ताला मागणी आहे.
गुरूजींची नोंदणी
मंगळागौरीचा विधी एक ते दीड तासांहून अधिक काळ चालतो. शास्त्रशुध्द पूजेसाठी गुरूजींची नोंदणी करण्यात येत आहे. एका पूजेसाठी एक ते दीड हजार रुपये घेण्यात येत आहेत. दिवसातून दोन ते तीन पूजा होत असल्याने गुरूजींची धावपळ होत असल्याने पौराहित्य करणाऱ्या महिलांनाही पूजेसाठी बोलावले जात आहे.