मनमाड – मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागासाठी महत्वाकांक्षी आणि उपयुक्त तसेच महत्त्वाचा प्रकल्प असलेल्या मनमाड ते जळगाव या रेल्वेच्या चौथ्या मार्गिकेसाठीच्या प्रकल्पासाठी मनमाडसह नांदगाव तालुक्यातील जमिनीच्या भूसंपादन प्रक्रियेला लवकरच सुरुवात होणार आहे.मनमाड -जळगाव दरम्यान रेल्वेची १६० किलोमीटर चौथी मार्गिका टाकण्यात येणार आहे, त्यासाठी मौजे बाभूळवाडी, परधाडी, मनमाड, नागापूर, आझादनगर या नांदगाव तालुक्यातील जमिनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे. भूसंपादना कामासाठी मध्य रेल्वेच्या निर्माण विभागाने सादर केलेल्या प्रस्तावानुसार नाशिक जिल्हाधिकारी यांनी येवला उपविभागाचे उपविभागीय अधिकारी अर्थात प्रांत अधिकारी यांना खासगी जमीन संपादनासाठी भूसंपादन प्रक्रियेचे सर्वाधिकार प्रदान केले आहे. या प्रकल्पांतर्गत नांदगाव तालुक्यातील मौजे बाभूळवाडी, परधाडी, मनमाड आझाद नगर या गावातील भू संपादन होणाऱ्या गटांची संयुक्त मोजणी करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने संबंधित विभागाने संयुक्त मोजणी व मूल्यांकन करणे आवश्यक आहे.
या अंतर्गत भूमी अभिलेख, तालुका कृषी अधिकारी बांधकाम विभाग, उपअभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, पंचायत समिती, वनक्षेत्र अधिकारी तसेच उपरोक्त गावातील मंडल अधिकारी अशा पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रकल्पासाठी जमिनीची मोजणी करणे, जमिनीतील फळ झाडांचे मूल्यांकन, बांधकामाच्या अनुषंगाने मूल्यांकन संपादित होत असलेल्या जमिनीतील कुपनलिका, विहीर, जलवाहिनी मूल्यांकन, झाडांचे मूल्यांकन, आणि जमिनीतील क्षेत्रांचे पंचनामे आधी विविध टप्प्यांवर हे काम होणार आहे. या मोजणीच्या कामकाजासाठी संबंधित विभागांची अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
पुरवठा क्षमतेचा विस्तार
कनेक्टिव्हिटीला चालना देण्यासाठी जळगाव-मनमाड ही १६० किलोमीटरची रेल्वे मार्गिका महत्त्वाची ठरणार आहे. यामुळे या विभागाची लॉजिस्टिक क्षमता वाढेल. शहर व प्रमुख रेल्वे स्थानकांवर गर्दी होण्यास मत होईल. तसेच जवाहरलाल नेहरू बंदर आणि प्रस्तावित वाढवण बंदराशी जळगाव, मनमाड व नाशिकची कनेक्टिव्हीटी वाढेल. यामुळे कृषी व औद्योगिक सामग्रीची वाहतूक सुलभ होऊन आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. नव्या मार्गिकेमुळे मुंबई-हावडा रेल्वे मार्गावरील उच्च घनतेच्या कॉरिडॉरवरील गर्दी कमी होईल. मनमाड-नाशिक रेल्वे मार्गिकेसाठी साधारणत: २७७३ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.