मनमाड : शहराला यापुढे १६ ते १७ दिवसांआड पाणी पुरवठा करावा, प्रत्येक विभागात अडीच तास पाणी वितरीत करावे, असे आदेश नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक शेषराव चौधरी यांनी प्रशासनाला दिले आहेत. शहरातील पाणी वितरणाबाबत मुख्याधिकारी चौधरी यांनी सर्व संबंधितांची तातडीची बैठक बोलावली होती. शहरात सध्या २४ दिवसाआड पाणी वितरण होते.

पाणी वितरणाच्या दिवसांमध्ये वाढ कशी झाली, याबाबत सविस्तर चर्चा झाली. त्यासाठीची तांत्रिक अडचण दूर झाली आहे. मनमाड शहरात यापुढे १७ व्या दिवशीच अथवा त्यापूर्वी पाणी पुरवठा करावा, प्रत्येक विभागाला अडीच तास पाणी वितरण करावे, पाण्याची बचत करावी, पाण्याचा अपव्यय होणार नाही याची घ्यावी, असे निर्देश प्रशासक चौधरी यांनी पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले. या कामात जे कर्मचारी हलगर्जीपणा करतील, त्यांच्याविरूध्द नियमानुसार कारवाई करण्यात येईल, अशी तंबी त्यांनी दिली.

हेही वाचा…राज्यात महायुतीमध्ये बंडखोरी अशक्य – केशव उपाध्ये यांना विश्वास

नागरिकांनीही पाणी पिण्यासाठीच वापरावे. पाण्याचा अपव्यय होणार नाही, याची दक्षता घ्यावी. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून तीव्रता अधिक जाणवत आहे. नागरिकांना होत असलेल्या पाणी पुरवठ्याचे दिवस कमी करण्याच्या दृष्टीने कराव्या लागणाऱ्या उपाय योजनांना नागरिकांनी प्रतिसाद द्यावा, ज्या भागात पाणी वितरण आहे, त्या भागातील नागरिकांनी त्या वेळेतच पाणी भरून घ्यावे. एखाद्या भागातील पाणी वितरण संपल्यानंतर दुसऱ्यांदा पाणी सोडण्यासाठी आग्रह करू नये, दुसऱ्यांदा पाणी वितरण होणार नाही, सध्या सकाळी पाच ते रात्री १२ पर्यंत वेळ करण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत होणाऱ्या पाणी पुरवठ्याद्वारे नागरिकांनी पाणी भरून घेण्याचे सहकार्य करावे, असे आवाहन चौधरी यांनी केले.

हेही वाचा…नाशिकच्या जागेचा तिढा आज सुटणार

सध्या मनमाड शहराला तांत्रिक अडचणींमुळे २२ ते २३ दिवसांआड पाणीपुरवठा होत होता. मात्र नव्या वितरण व्यवस्थेत रात्री पाणी पुरवठा करीत पुढील आठवड्यापासून १७ दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. – शेषराव चौधरी ( मुख्याधिकारी तथा प्रशासक, मनमाड नगरपरिषद)