नाशिक: महायुतीत नाशिकची जागा कुणाच्या पदरात पडणार, उमेदवार कोण असणार, याची स्पष्टता गुरुवारी होणार असल्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. शिवसेनेची (शिंदे गट) ही जागा असून ती आम्हाला मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दुसरीकडे जागेचा तिढा सोडविला जात नसल्याने राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी ज्यांना द्यायची असेल, त्यांना ही जागा द्यावी, पण २० मे पूर्वी निर्णय घ्यावा, अशा शब्दांत टोलेबाजी करुन मुंबईकडे प्रयाण केले.

तीनही पक्षांच्या दाव्यामुळे वादात सापडलेल्या नाशिकच्या जागेचे रहस्य अद्याप कायम आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाने साताऱ्याच्या बदल्यात नाशिकची जागा मागितली होती. त्यावर कुठलाही निर्णय न घेता भाजपने साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर केली. रामनवमीच्या निमित्ताने पंचवटीतील काळाराम मंदिरात दर्शनासाठी आलेल्या केसरकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना श्रीरामाचे धनुष्यबाण नाशिकमध्ये आम्हाला मिळेल, असे आपण गृहीत धरले असल्याचे सांगितले. महायुतीच्यावतीने गुरुवारी पत्रकार परिषद घेणार आहोत. नाशिकच्या जागेबाबतची स्पष्टता त्यावेळी होईल, असे त्यांनी नमूद केले.

हेही वाचा…जामनेर तालुक्यातील आगीत सात घरे भस्मसात, गॅस सिलिंडरच्या स्फोटाने गाव हादरलेन

पंचवटीतील काळाराम मंदिरात सकाळपासून राजकीय नेत्यांची दर्शनासाठी रिघ लागली होती. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे या दोन्ही इच्छुक उमेदवारांची मंदिर प्रांगणात भेट झाली. आपण त्यांना शुभेच्छा दिल्याचे भुजबळ यांनी सांगितले. केसरकर यांच्या दाव्याबाबत त्यांनी महायुतीने कुठल्याही पक्षाला जागा सोडावी, पण २० मेआधी निर्णय घ्यावा, असा टोला हाणला. ही जागा शिंदे गटाला सुटली तरी महायुतीच्या प्रचाराला आपण हजर असल्याचे त्यांनी आश्वस्त केले. नाशिक लोकसभेसाठी २० मे रोजी मतदान होणार आहे. तीन-चार आठवड्यांपासून नाशिकच्या जागेचे त्रांगडे कायम आहे.

हेही वाचा…खंडणीखोर वैभव देवरेविरुध्द पाच गुन्हे दाखल, भाजप पदाधिकाऱ्याकडून तीन कोटी खंडणी

शिंदे गटात साशंकता

महायुतीत नाशिकची जागा आपल्या वाट्याला येईल, याबद्दल शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना खात्री नाही. साताऱ्याची राष्ट्रवादी अजित पवार गटाची जागा भाजपने हिसकावून घेतल्याने नाशिकची जागा राष्ट्रवादीला दिली जाईल, अशी काहींना साशंकता वाटते. रामजन्मोत्सव सोहळ्यास छगन भुजबळ यांनी सहकुटुंब हजेरी लावल्याचे राजकीय वर्तुळात वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. काळाराम मंदिरात दर्शन घेतल्यानंतर भुजबळ हे दुपारी लगेच मुंबईकडे मार्गस्थ झाले. त्यामुळे राष्ट्रवादीने या जागेवरील दावा सोडलेला नसल्याचे म्हटले जात आहे.