अवकाळीने बागायतदारांचे कोटय़वधींचे नुकसान; वीज, पाणी पुरवठा विस्कळीत
सलग चार दिवसांपासून वेगवेगळ्या भागास झोडपून काढणाऱ्या पावसाने शुक्रवारी मध्यरात्री ग्रामीण भागासह शहरी भागासही जोरदार तडाखा दिला. नाशिक, निफाड, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाने पिकांच्या नुकसानीचे सत्र कायम ठेवले. त्यात द्राक्ष बागा व गव्हाचे मोठे नुकसान झाल्याची भीती व्यक्त होत आहे. दिंडोरी तालुक्यात १२ घरांचे नुकसान झाले. मागील चोवीस तासात जिल्ह्यात १११.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पावसामुळे बहुतांश भागातील वीज पुरवठा खंडित झाला. त्याचा विपरीत परिणाम शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत होण्यात झाला. गंगापूर धरणाच्या वीज केंद्राचा वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे अनेक भागात पाणी पुरवठा होऊ शकला नाही.गंगापूर धरणाच्या वीज केंद्राचा वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे अनेक भागात पाणी पुरवठा होऊ शकला नाही.
गारपीट व अवकाळी पावसाने शेतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे. गेल्या काही वर्षांत नैसर्गिक आपत्तीचे हे संकट दरवर्षी कोसळत असल्याचे दिसून येते. गेल्या रविवारपासून वेगवेगळ्या भागात हजेरी लावणाऱ्या अवकाळी पावसाने शुक्रवारी मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह पुन्हा झोडपले. शहरात १५ ते २० मिनिटे मुसळधार स्वरूपात झालेल्या पावसाचा आवाज जणू धबधबा कोसळल्याप्रमाणे होता. त्यानंतर सकाळपर्यंत रिपरिप सुरू राहिली. जुने नाशिक परिसरात घरावर झाड कोसळले. सुदैवाने त्यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मध्यरात्री शहरातील बहुतांश भाग अंधारात बुडाला. वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तो पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला. पण सकाळपर्यंत विजेचा लपंडाव सुरू होता. गंगापूर धरणावरील उपकेंद्राचा वीज पुरवठाही खंडित झाला. यामुळे चार तास धरणातून पाणी उचलण्याची प्रक्रिया बंद होती. त्याचा विपरीत परिणाम दैनंदिन पाणी पुरवठा विस्कळीत होण्यात झाला. नवीन नाशिक, सातपूर, नाशिक पूर्व व पश्चिम आणि पंचवटीतील अनेक भागात पाणी आले नाही. ज्या ठिकाणी आले तिथे पाण्याचा दाब कमी राहिल्याच्या तक्रारी महिलांनी केल्या. पाणी पुरवठय़ाचे प्रमाण कमी राहिल्याचे पालिकेने मान्य केले. वीज पुरवठय़ाची स्थिती फारशी वेगळी नव्हती. इमारतीच्या टाकीत पाणी असले तरी वर नेण्यासाठी वीज नव्हती. काही भागात सकाळी नऊ वाजता वीज पुरवठा सुरळीत झाला.
चोवीस तासात जिल्ह्यात जिल्ह्यात सुमारे ११२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. नाशिक तालुक्यात सर्वाधिक म्हणजे ६० मिलिमीटर पाऊस झाला. यामुळे द्राक्ष पिकाला मोठा फटका बसला आहे. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी या भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. पेठ, निफाड, सिन्नर, चांदवड, येवला व कळवण तालुक्यात तो रिमझिम स्वरूपात होता. वादळी वाऱ्याने दिंडोरीच्या मौजे देहरे व चिकाडी तसेच वरवंडी येथील एकूण १२ घरांचे नुकसान झाले. आधीच्या पावसात जिल्ह्यातील चार हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असताना या पावसाने त्यात आणखी भर पडणार आहे. गहू, डाळिंब, द्राक्ष, भाजीपाला व हरभरा पिकांचे नुकसान झाले आहे.
एका रात्रीत होत्याचे नव्हते
अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका द्राक्ष बागांना बसला. निफाड तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील संपत कदम यांच्या दोन एकरच्या द्राक्ष बागेची काढणी शुक्रवारपासून सुरू होणार होती. मध्यरात्री कोसळलेल्या पावसाने सर्व होत्याचे नव्हते झाले. पुढील दहा दिवसांनी त्यांच्या पुतणीचे लग्न आहे. त्यांची भिस्त द्राक्षातून येणाऱ्या उत्पन्नावर होती. परंतु, रात्रीच्या पावसाने द्राक्ष बागेचे अतोनात नुकसान झाले. नाशिक शहरालगतच्या मखमलाबाद, मातोरी, सामनगाव परिसरात द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले. कदम यांच्याप्रमाणे शेकडो द्राक्ष उत्पादकांवर नैसर्गिक आपत्तीचे कमी-अधिक प्रमाणात असेच संकट कोसळले. गहू आडवा झाला.
राष्ट्रवादीचे आज आंदोलन
अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतमालाच्या झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून सरकारने तातडीने भरपाई द्यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शनिवारी सकाळी अकरा वाजता संपूर्ण जिल्ह्यात आंदोलन करण्यात येणार आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होत असताना सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. यामुळे हतबल शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत असल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार यांनी केला. अस्मानी संकटाची दखल घेऊन सरकारने तातडीने मदत करावी यासाठी तालुक्याच्या ठिकाणी आंदोलन केले जाणार आहे.