नाशिक – शतकोत्तर वाटचाल केलेल्या नाशिक सार्वजनिक वाचनालयाने अन्य ग्रंथालयांचे दायित्व स्वीकारले पाहिजे. राज्यातील अनेक ग्रंथालयांना अशा पालकत्वाची गरज आहे. ग्रंथालये ही सार्वजनिक वाचनालय नाशिकसारखे विविध उपक्रम राबविणारी हवीत, अशी अपेक्षा मराठी भाषा तथा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली.
येथील सार्वजनिक वाचनालय नाशिक आणि नागरिक शिक्षक गौरव समिती यांच्या सहकार्याने आयोजित शिक्षक गौरव सोहळ्यात सामंत यांनी मार्गदर्शन केले. राज्यात २०१२ मध्ये १६,७०० ग्रंथालये होती. त्यांची संख्या आता १२ हजारांवर आली आहे. राज्यात मायबोली काय असते हे दाखविण्याचे काम सावानाने केले आहे. ग्रंथालय गुरूजनांचा सत्कार करीत असल्याचे पहिल्यांदा पाहिले, असेही सामंत यांनी सांगितले.
तीन महिन्यांपूर्वी हिंदी सक्तीविषयी विरोधी वातावरण निर्माण करण्यात आले. महायुतीच्या सरकारने ही सक्ती केल्याचा गैरसमज पसरविला गेला. परंतु, हे आधीच झाले होते. अशा लोकांना जवळ ठेवायचे की लांब, हे तुम्ही ठरवा, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी त्यांनी मराठी भाषा मंत्री म्हणून केलेल्या कामांचाही त्यांनी उल्लेख केला. यावेळी व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके, समितीचे अध्यक्ष डॉ. किशोर पवार यांच्यासह वाचनालय आणि नागरिक शिक्षक गौरव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते
सावानास मदत जाहीर
सार्वजनिक वाचनालय नाशिकच्या वतीने साहित्य संमेलनासाठी पाच लाखांची मदत मागण्यात आली. आपण १० लाख देण्यात तयार आहोत. वाचनालयाने पाच लाखात साहित्य संमेलन करावे. अन्य पाच लाखात ग्रामीण साहित्यिकांना व्यासपीठावर आणून त्यांचा सत्कार करावा, अशी अपेक्षा मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली. वाचनालयाच्या विविध उपक्रमांसाठी शासनाचे सहकार्य राहील, असेही त्यांनी सांगितले.