नाशिक – कुसुमाग्रज विचार मंचच्यावतीने आयोजित पहिल्या अखिल भारतीय मराठी भाषा संस्कृती परिषदेत एकाचवेळी आयोजित परिसंवाद व गटचर्चा उपस्थितीवर विपरित परिणाम करीत आहे. पहिल्या दिवशी ‘मराठीच्या अवनतीची कारणे ‘ या महत्वाच्या परिसंवादाकडे मराठी जनांनी पाठ फिरवल्याचे पहायला मिळाले.
अखिल भारतीय मराठी भाषा संस्कृती परिषदेचे उद्घाटन शनिवारी ज्येष्ठ साहित्यिक डाॅ. श्रीपाद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा. वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. जोशी यांनी मराठीच्या अवहेलनेला मराठी माणूस आणि शासन जबाबदार असल्याकडे लक्ष वेधले.
शासन मराठीबाबत उदासीन असून मराठी माणसाला आपल्या भाषेबद्दल संवेदनशीलता राहिलेली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. उद्घाटनानंतर पुढील सत्रात त्याची प्रचिती आली. दुपारी ‘ मराठीच्या अवनतीची कारणे ‘ या परिसंवादात डॉ. प्रकाश परब व ज्ये्ष्ठ पत्रकार श्रीधर लोणी सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी मराठीच्या अवनतीची कारणे नमूद केली. ज्या रावसाहेब थोरात सभागृहात हा परिसंवाद झाला, तो सुमारे ६०० आसन क्षमतेचा आहे. या परिसंवादात केवळ २० ते ३० श्रोते उपस्थित होते. याबद्दल मान्यवरांनी नाराजी व्यक्त केली.
पहिल्या दिवशी वेगवेगळ्या सभागृहात सहा विषयांवर गटचर्चां झाली. यात मराठीच्या वृद्धीसाठी शासनाची उदासीनता , ‘ मराठी माध्यमातून शिक्षण का?’, विभागीय साहित्य संस्था केवळ साहित्य केंद्रीच का?’ , ‘ बृहन्महाराष्ट्रातील मराठी समाज आणि वास्तव ‘ , ‘ विदेशातील मराठी ‘ या विषयांचा समावेश होता. तर रविवारी
वेगवेगळ्या सभागृहात एकूण १३ विषयांवर गटचर्चां होणार आहे. परिषदेत दोन दिवसात दोन परिसंवाद आणि मराठी भाषा, संस्कृतीसमोरील विविध आव्हानांविषयक एकूण १९ विषयांवरील गटचर्चा असा भरगच्च कार्यक्रम उपस्थितीवर परिणाम करीत असल्याचे सांगितले जाते. स्थानिकांचा सहभाग असणाऱ्या सायंकाळच्या सत्रात गर्दी होती. सायंकाळी काही अंशी उपस्थितांची गर्दी होती.
संयोजकांची अजब भूमिका
या संदर्भात कुसुमाग्रज मराठी विकास मंचने गर्दी जमवण्यासाठी हा कार्यक्रम नसल्याचे म्हटले आहे. परिषदेतील सर्व कार्यक्रम वैचारिक आहेत. त्यातून मराठी भाषेला वेगळी दिशा मिळणार असल्याचा दावा मंचचे अध्यक्ष सतीश बोरा यांनी केला. तर मंचचे सरचिटणीस सुभाष सबनीस यांनीही परिषदेत संमेलनासारखी गर्दी होईल, असे अपेक्षित नसल्याचे सांगितले.