महाराष्ट्रातील १८ संस्था पात्र
चाळीसगाव येथील रंगगंध कलासक्त न्यासच्या वतीने आयोजित पुरुषोत्तम दारव्हेकर अखिल भारतीय मराठी साहित्य अभिवाचन स्पर्धेची अंतिम फेरी चाळीसगावच्या साने गुरुजी भवनात २६ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. अंतिम स्पर्धेत एकूण १८ संघ अभिवाचन करणार आहेत. या स्पर्धेचे हे १४ वे वर्ष आहे. अशा तऱ्हेची सातत्याने होणारी ही महाराष्ट्रातील एकमेव स्पर्धा आहे. स्पर्धेची प्राथमिक फेरी महाराष्ट्रातील ११ ठिकाणी घेण्यात आली. पुण्याचे महाराष्ट्र कल्चरल सेंटर, नांदेडचे रसिकाश्रय, अमरावतीची गिरीषा बहुउद्देशीय संस्था, अमरावती, सांगलीतील अ. भा. मराठी नाटय़ परिषदेची शाखा, नागपूर महानगर शाखा, औरंगाबाद शाखा, मुंबईत व्हिजन व पु. ल. देशपांडे अकादमी, जळगावमध्ये मू. जे. महाविद्यालय, नाशिकमध्ये लोकहितवादी मंडळ, लातूरमध्ये सूर्योदय आणि अहमदनगरमध्ये सप्तरंग थिएटर्स या संस्थांच्या सहकार्याने दीड महिन्याच्या कालावधीत त्या त्या ठिकाणी प्राथमिक फेरी घेण्यात आली. यामध्ये सुमारे ११० स्पर्धक संस्थांनी सहभाग घेतला. बाह्य़ परीक्षक म्हणून रंगगंध प्रतिनिधी सुरेश बार्से (अमरावती), सतीश पाटील (मुंबई), सतीश देशमुख (पुणे), मानसी राणे आदींनी काम पाहिले. अंतिम फेरीसाठी स्पर्धक संख्येनुसार प्रत्येक केंद्रावरून एक ते तीन स्पर्धक संघाची निवड करण्यात आली. मुंबई केंद्रातून सर्वाधिक म्हणजे २४ प्रवेशिका आल्यामुळे तीन स्पर्धकांची निवड करण्यात आली. जळगाव केंद्रातून परिवर्तनचे ‘द्रोण’, अविरण थिएटरचे ‘हिंदू’, नाशिक केंद्रातून कृपा शैक्षणिक बहुउद्देशीय संस्थेचे ‘पांढरा बुधवार’ यांसह एकूण १८ अभिवाचनाची निवड करण्यात आली आहे.
या स्पर्धकांसोबत बेळगाव आणि इंदूर येथून आलेल्या तीन स्पर्धकांचीही अंतिम फेरी घेण्यात येणार आहे. चाळीसगाव परिसरातील रसिकांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन रंगगंधचे अध्यक्ष डॉ. मुकुंद करंबळेकर, स्पर्धा प्रमुख राजेंद्र चिमणपुरे व रंगगंध परिवाराने केले आहे.