विजयादशमीच्या दिवशी शहरी भागातील बाजारपेठांना वेगळी झळाळी प्राप्त झाली असून साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दसऱ्याचे औचित्य साधत ग्राहकांनी खरेदीचा योग साधला. घरापासून सुवर्ण दागिन्यांपर्यंत, इलेक्ट्रॉनिक्स व घरगुती वस्तु तसेच वाहन खरेदीत कमालीचा उत्साह पहावयास मिळाला. ग्राहकांच्या खरेदीच्या उत्साहामुळे एकाच दिवसात कोटय़वधींची उलाढाल झाली. शहरी भागात हे चित्र असले तरी ग्रामीण भागातील बाजारपेठांवर मात्र दुष्काळ व पाणी टंचाईचे सावट पहावयास मिळाले. पावसाअभावी यंदा पिकांचे उत्पन्नही फारसे हाती लागले नाही. त्याचा परिणाम ग्रामीण बाजारपेठांवर झाला. दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने शहर परिसरात विविध ठिकाणी संचलन करण्यात आले. पोलीस आयुक्तालयात शस्त्रपूजन करण्यात आले.
साडे तीन मुहूर्तापैकी एक असल्याने दसऱ्याला वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे. या निमित्त काही धार्मिक कार्यक्रमही पार पडले. त्यात गुरूदर्शन, दीक्षा आदी पारंपरिक पध्दतीने विधींचा समावेश होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने शहर परिसरात विविध ठिकाणी संचलन करण्यात आले. नवचैतन्याचे प्रतीक असलेल्या आणि रावणावर विजय मिळवत रामाने केलेल्या सीमोल्लंघनाची आठवण म्हणून अनेकांनी घरादाराला झेंडुची तोरणे बांधुन आनंदोत्सव साजरा केला. यंदा कुंभमेळा, पावसाच्या लपंडावामुळे झेंडुच्या फुलांची आवक घटली. साहजिकच त्याचा परिणाम उत्पादन घटण्यात झाला. यामुळे ८० ते १०० रुपये शेकडो दराने ग्राहकांना त्यांची खरेदी करावी लागली. दुपारनंतर मात्र हे भाव काही अंशी घसरले. दसऱ्याचा मुहूर्त व्यावसायिकांसाठी पर्वणी ठरला. तीन-चार महिन्यांपासून आर्थिक मंदीमुळे अस्थिरता अनुभवणाऱ्या बाजारपेठेत या निमित्ताने कोटय़वधींची उलाढाल झाली.
वाहन क्षेत्र त्यात आघाडीवर राहिले. चारचाकी वाहन खरेदीसाठी तर ग्राहकांची अशी काही गर्दी झाली, की त्या त्वरित उपलब्ध होणे अवघड बनले. परिणामी, या मुहूर्तावर नोंदणी करून वाहन प्रत्यक्ष हाती येण्यास दिवाळीपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. या मुहूर्तावर दुचाकी खरेदीकडे अनेकांचा कल होता. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्यावसायिकांनी वेगवेगळ्या योजनांचा पाऊस पाडला. त्याचा लाभ घेण्याची संधी कोणी दवडली नाही. शून्य टक्के व्याजदरावर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू उपलब्ध असल्याने अत्याधुनिक टीव्ही, फ्रिज यांची धडाक्यात खरेदी झाली. बाजारातील या उत्साहात सराफ बाजार कुठेही मागे राहिला नाही. उलट या दिवशी लग्नसराईतील खरेदी अनेकांनी करून घेतली. दसऱ्यानिमित्त सराफ व्यावसायिकांनी पेशवेकालीनपासून ते आतापर्यंतच्या आधुनिकतेपर्यंतचे आकर्षक सजावटीत घडविलेले दागिने सादर केले. काहींनी आगाऊ नोंदणी करत सवलतींचा लाभ घेतला. या दिवशी चोख सोने खरेदीचा नेहमीचा कल कायम राहिला. दागदागिन्यांपेक्षा अनेकांनी सोन्याचे बिस्कीट, वेढा याची खरेदी केली. अनेकांनी जुने दागिने मोडून त्यात भर घालत मालिकांमधील महिलांच्या अंगावरील दागिन्यांच्या नक्षीकामाप्रमाणे दागिने खरेदी केले. ग्राहकांना आकृष्ट करण्यासाठी जेवढय़ा वजनाचे सोन्याचे दागिने तेवढय़ा वजनाची चांदी भेट, स्मार्ट फोन यासह पैठणी आदी बक्षिसांच्या योजनांना उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
ग्रामीण बाजारपेठांमध्ये मात्र असा उत्साह अभावाने दिसला. दुष्काळ व टंचाईच्या गर्तेत सापडलेल्या ग्रामीण भागात शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळालेले नाही. पावसाळ्यात सातत्य नसल्याने कमालीचे नुकसान सहन करावे लागले. याचा परिणाम ग्रामीण भागांतील ग्राहकांच्या खरेदीवर झाला.