नाशिक – नाशिक जिल्ह्यात १५ क्रीडा संकुल आहेत. परंतु, प्रत्यक्षात दोनच तालुका क्रीडा अधिकारी आहेत. याशिवाय नाशिकच्या जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे नंदूरबार येथील क्रीडा कार्यालयाची जबाबदारी आहे. अपुऱ्या मनुष्यबळावर काम होत असल्याने याचा  परिणाम खेळांडूवर होत आहे, अशी कबुली क्रीडा मंत्री ॲड. माणिक कोकाटे यांनी दिली.

येथील विविध क्रीडा संघटनांच्या वतीने क्रीडा मंत्री कोकाटे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात सत्काराला उत्तर देतांना कोकाटे यांनी क्रीडा क्षेत्रातील सद्यस्थितीवर  भाष्य केले. क्रीडा संकुल आणि तालुका क्रीडा अधिकारी स्तरावरील परिस्थिती सुधारण्यासाठी लवकरच क्रीडा विभागाकरिता आकृतीबंध मंजूर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कृषिमंत्री असतांना नऊ महिन्यात ५२ अध्यादेश काढून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले होते,  याप्रमाणे आता क्रीडामंत्री म्हणून जबाबदारी पार पाडताना खेळांडूना अधिकाधिक चांगल्या संधी देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे कोकाटे यांनी सांगितले. क्रीडा विभागात अधिकाधिक सुधारणा करायची आहे.  क्रीडा शिक्षकांच्या दृष्टीने अल्पसंख्यांक शाळेत दोन क्रीडा शिक्षकांची भरती करण्याचे बंधनकारक करणार असल्याचे कोकाटे यांनी जाहीर केले.

व्यासपीठावर नाशिक जिमखान्याचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड ,नाशिक क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष धनपाल शहा, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे, अर्जुन टिळे, मंदार देशमुख आदी उपस्थित होते.  कोकाटे यांनी, क्रीडामंत्री म्हणून मिळालेल्या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. राज्यातील क्रीडा धोरणासह क्रीडा विभागात कोणत्या नाविन्यपूर्ण गोष्टी करता येईल, त्यादृष्टीने अभ्यास सुरू असून अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

राज्यातील सात विभागासाठी सामाजिक दायित्व निधीतून  खास बस तयार करण्यात येणार असून शहरासह ग्रामीण भागात या बसव्दारे विद्यार्थी, खेळांडूची आरोग्य तपासणी करण्यात येईल. अल्पसंख्यांक विभागाची जबाबदारी देखील आपल्याकडे असल्याचे त्यांनी सांगितले. क्रीडा अधिकाऱ्यांनी रोज एक तास मैदानावर देण्याची गरज आहे.  क्रीडा विभागाच्या अधिकाऱ्यांनी खेळांडूंसाठी अधिकाधिक वेळ द्यावयास हवा. अधिकारी कार्यालयात एक तास उशिरा आले तरी चालतील. परंतु, रोज एक तास मैदानावर त्यांनी दिलाच पाहिजे. त्यादृष्टीने विभागातील सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिल्याचे कोकाटे यांनी सांगितले.

१५ क्रीडा संकुलात फक्त दोन क्रीडा अधिकारी नाशिक जिल्ह्यात १५ क्रीडा संकुल आहेत.  प्रत्यक्षात दोनच तालुका क्रीडा अधिकारी आहेत. याशिवाय नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे नंदूरबार येथील क्रीडा कार्यालयाची  जबाबदारी आहे. अपुऱ्या मनुष्यबळावर काम होत असल्याने त्याचा परिणाम खेळांडूवर हाेत असल्याचे क्रीडा मंत्री ॲड. माणिक कोकाटे यांनी मान्य केले.