नाशिक – राज्यातील पाणी प्रश्न आजवर श्रेयवादाच्या लढाईत सुटले नसल्याकडे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लक्ष वेधले. अहिल्यानगरमधील निळवंडे धरणाचा दाखला देत त्यांनी राज्यातील एका नेत्याने तीनवेळा या धरणाचे भूमीपूजन केल्याचा टोला हाणला. यामुळे उपस्थितांमध्ये तो नेता म्हणजे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते शरद पवार की आणखी कोणी, अशी चर्चा सुरू झाली.

उल्हास वैतरणा कोकण-गोदावरी नदीजोड प्रकल्प कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी जलसंपदामंत्री विखे पाटील हे बोलत होते. याप्रसंगी अन्न नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ, क्रीडामंत्री ॲड माणिकराव कोकाटे, खासदार भास्कर भगरे यांच्यासह अहिल्यानगर व नाशिकमधील महायुतीचे अनेक आमदार उपस्थित होते. यावेळी विखे यांनी उल्हास वैतरणा नदी जोड प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी ६१ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचे नमूद केले.

जानेवारी २०२६ पर्यंत हा अहवाल शासनाला सादर होणार असून त्यावर सत्वर कार्यवाही सुरू होईल. दमणगंगा एकदरे, दमणगंगा वैतरणा देवनदी गोदावरी नदी जोड, उल्हास वैतरणा गोदावरी, पार गोदावरी प्रकल्प शासनाच्यावतीने राबविण्यात येणार आहे. याचा फायदा नाशिक, संभाजीनगर आणि मराठवाड्याला होणार आहे. याद्वारे मुबलक स्वरूपात पाणी उपलब्ध होईल. राज्यातील महत्वाच्या काही नदीजोड प्रकल्पांना केंद्र शासनाच्या माध्यमातून ९० टक्के निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा केला जात असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.

निळवंडे धरण बांधायला ३५ ते ४० वर्षांचा कालावधी लागला. महाराष्ट्रातील एका नेत्याने तीनवेळा या धरणाचे भूमीपूजन केले होते. प्रत्येकवेळी त्यांच्याकडून विखे-पाटील यांचा विरोध असल्याचे सांगितले जात असे. एकदा विखे-पाटील यांचा विरोध आहे, हे सांगण्यासाठी भूमीपूजन झाले. श्रेयवादाच्या लढाईत पाणी प्रश्न सहजासहजी सुटत नाही.

पाणी परिषदेचे गणपतराव देशमुख, बाळासाहेब विखे-पाटील व जलसंपदा विभागा्च्या अधिकाऱ्यांनी तयार केलेल्या आराखड्याकडे पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी संबंधितांना श्रेय गेल्यास आपले काय होईल म्हणून दुर्लक्ष केल्याची टीका केली. अखेर महायुती सरकारच्या काळात निळवंडे धरण पूर्ण होऊन त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झाल्याचे जलसंपदामंत्री विखे पाटील यांनी सांगितले. कार्यक्रमास नाशिक व अहिल्यानगरमधील शेतकरी उपस्थित होते.

विखे पाटील यांच्या विधानामुळे निळवंडे धरणाचे भूमीपूजन कोणी केले होते, याचे अंदाज उपस्थितांकडून लावण्यात आले. विखे-पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्यातील राजकीय वैमनस्य सर्वश्रूत आहे. शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा अनेकदा सांभाळलेली आहे. विखे पाटील यांच्या बोलण्याचा रोख त्यांच्यावर असल्याची कुजबूज कार्यक्रमस्थळी सुरू होती.