जळगाव – जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात पीक नुकसान अनुदान वाटपासाठी शासनाकडून प्राप्त झालेल्या रकमेतून सुमारे एक कोटी २० लाख १३ हजार ५१७ रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी तत्कालिन महसूल सहायकासह त्याचा साथीदार मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी यांच्या विरोधात पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमोल भोई असे संशयित महसूल सहायकाचे नाव आहे. पाचोरा येथे तहसील कार्यालयात कार्यरत असताना भोईने स्वतःचा आर्थिक लाभ करण्याच्या हेतूने २०२२-२३ आणि २०२४-२५ या दोन वर्षांच्या कालावधीत पाचोरा तालुक्यातील काही गावांमधील लाभार्थी शेतकऱ्यांच्या बनावट याद्या तयार केल्या. त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सुमारे एक कोटी २० हजार १३ हजाराची रक्कम जमा केली.

हा सर्व प्रकार केल्यावर भोईने ज्यांच्या नावावर पीक नुकसान भरपाईचे पैसे जमा केले होते, त्या शेतकऱ्यांशी नंतर वैयक्तिक संपर्क साधला. तसेच संबंधितांकडून त्यांच्या नावावर जमा झालेले पैसे ताब्यात घेतले. हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर महसूल सहायक अमोल भोई आणि मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी गणेश चव्हाण यांच्या विरोधात पाचोरा पोलीस ठाण्यात रविवारी दुपारी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही तहसीलदार विजय बनसोडे यांच्या तक्रारीवरून करण्यात आली.

जून ते ऑक्टोबर-२०२२ कालावधीतील खोट्या आणि बनावट पंचनाम्यांच्या आधारे वाटप झालेल्या अनुदानाच्या काही याद्या अद्याप तपासलेल्या नाहीत. त्यामुळे भोईने अपहार केलेल्या रकमेचा आकडा आणखी वाढू शकतो. राज्य शासनाकडून नैसर्गिक आपत्तीमुळे २०२२-२३ आणि २०२४-२५ या दोन वर्षात ३४७ बाधित शेतकऱ्यांसाठी भरपाईची रक्कम आली होती. मात्र, बनावट याद्या तयार करुन ही रक्कम पात्र नसलेल्या तसेच शेती नावावर नसलेल्या व्यक्तींच्या नावावर टाकण्यात आली. पुढे बनावट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झालेली रक्कम परस्पर काढून ती स्वतःसाठी वापरल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. जून ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत बनावट दस्ताऐवज तयार करून ते पंचनाम्यात जोडण्यात आले आहेत.

असा उघडकीस आला अपहार

गेल्या महिन्यात पीक नुकसान भरपाईचे अनुदान खात्यात जमा झाले नाही, अशी अनेक शेतकऱ्यांची तक्रार होती. या तक्रारीनंतर लाभार्थ्यांची मूळ यादी ग्रुपवर शेअर करण्यात आली. तेव्हा महसूल सहाय्यक अमोल भोई यांनी संबंधित लिपिकाला “यादी अपलोड करू नका, माझ्याकडे खरी यादी आहे” असे सांगितले. मात्र, लिपिकाने त्याचे न ऐकता यादी अपलोड केली आणि त्यातून भोई याने केलेला गैरव्यवहार उघड झाला. आंबे वडगाव येथील तलाठ्यांनी या यादीची प्रत चावडीवर लावली असता, लाभार्थ्यांची नावे आणि आधार क्रमांक पूर्णपणे वेगळे असल्याचे स्पष्ट झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळायला हवे होते, ते पैसे इतर गावातील लोकांना दिले गेल्याचे आढळून आले. त्यानंतर सर्व गावांतील याद्यांची तपासणी सुरू झाली आणि मोठा घोटाळा उघडकीस आला. चौकशीसाठी बोलावल्यावर अमोल भोई यांनी या गैरव्यवहाराची कबुली दिली.