नाशिक : शहरातील खड्डेमय रस्त्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेसमोरील खड्डय़ांभोवती आंदोलन केले. या प्रश्नी पालिका आयुक्तांना भेटण्यासाठी मुख्यालयात जाणाऱ्या आंदोलकांना सुरक्षारक्षकांनी प्रवेशद्वारावर रोखल्याने गोंधळ उडाला. उभयतांमध्ये जोरदार वाद झाले. नंतर मनसेच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या दिला. त्यांना फूल नसलेला गुच्छ देऊन प्रशासनाच्या कारभाराचा निषेध केला.

पावसात शहरातील बहुतांश रस्त्यांची बिकट अवस्था झाली असून वाहनधारक, पादचाऱ्यांना मार्गक्रमण करणे अवघड झाले आहे. नवीन रस्तेही त्यास अपवाद राहिले नाहीत. रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत दोषी अधिकारी आणि संबंधित कंत्राटदारांवर कारवाई करावी, या मागणीसाठी मनसेतर्फे राजीव गांधी भवन समोरील शरणपूर रस्त्यावर आंदोलन करण्यात आले. खड्डय़ांमध्ये फुले वाहून श्रद्धांजली वाहण्यात आली. नंतर मनसेचे संघटक विनय अहिरे, महिला विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षा सुजाता डेरे, अतुल पाटील, गौरव निमसे यांच्यासह कार्यकर्ते ढोल ताशांच्या गजरात आयुक्तांना भेटण्यासाठी मुख्यालयात जाण्यास निघाले. त्या वेळी सुरक्षारक्षकांनी मुख्य प्रवेशद्वार बंद केले.

यावरून आंदोलक आणि त्यांच्यात जोरदार वादंग झाले. दरवाजा उघडण्यासाठी प्रयत्न झाले. यामुळे गोंधळ उडाला. महिला सुरक्षारक्षक नसताना पुरुष सुरक्षारक्षकांनी महिला आंदोलकांना रोखण्यावर आक्षेप घेतले गेले.  अखेर सुरक्षारक्षकांनी आंदोलकांची माफी मागत शिष्टमंडळास आतमध्ये प्रवेश दिला.

मनपा आयुक्त कार्यालयात नसल्याने आंदोलकांनी अतिरिक्त आयुक्त अशोक आत्राम यांच्या दालनाकडे मोर्चा वळवला. पण त्यांच्या दालनाचा दरवाजा उघडला जात नसल्याने संतप्त आंदोलकांनी दालनाबाहेर ठिय्या देऊन घोषणाबाजी केली. नंतर मनसेच्या शिष्टमंडळास आत्राम यांची भेट मिळाली.

रस्त्यांवरील खड्डे आणि डेंग्यू, चिकुनगुनियासारखे आजार बळावत असताना फवारणी होत नसल्याने फुले नसलेला गुच्छ देऊन निषेध नोंदविल्याचे आंदोलकांनी सांगितले. शहरातील सर्व रस्ते तातडीने दुरुस्त करून रस्त्याच्या दुरवस्थेबाबत संबंधित कंत्राटदारास दोषी धरून त्याला कायमस्वरूपी काळय़ा यादीत टाकावे, संबंधित विभागाच्या कामाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. अतिरिक्त आयुक्तांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत खड्डय़ांची पाहणी करून ते बुजविण्याचे आश्वासन दिल्याचे सुजाता डेरे यांनी सांगितले.