टोल न भरता तासभर वाहने रवाना

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावर खड्डे पडल्याने त्वरित महामार्गाची दुरुस्ती करण्याची मागणी मनसेच्या वतीने इगतपुरी तालुक्यातील घोटी टोल व्यवस्थापनाला चार दिवसापूर्वी देण्यात आले होते. चार दिवसात महामार्ग दुरुस्तीला सुरुवात न केल्यास टोलनाका बंद पाडण्याचा इशारा देण्यात आला होता. नाका प्रशासनाने इशाऱ्याची दखल न घेतल्याने अखेर मंगळवारी घोटी टोल नाक्यावर मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप किर्वे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून नाका बंद करण्यात आला. टोलनाका एक तास बंद राहिल्याने अनेक वाहने टोल न भरताच गेली.

वाडीवऱ्हे, गोंदे, घोटी, इगतपुरी येथे महामार्गावर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे रोज अपघात होत असून बऱ्याच प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण कायमचे जायबंदी झाले आहेत. २२ ऑगस्ट रोजी महामार्गावरील बोरटेंभे फाट्यावर नांदगावसदो येथील लक्ष्मीबाई भटाटे या मुलाबरोबर नांदगावसदो ते घोटी असा मोटर सायकलने प्रवास करत असताना मागील चाक खडड्यात गेल्याने झालेल्या अपघातात लक्ष्मीबाई यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मनसे महामार्ग दुरुस्तीसाठी अधिक आक्र मक झाली. दुरस्तीसाठी चार दिवसांची मुदत देऊनही टोलनाका प्रशासनाने दखल न घेतल्याने घोटी टोलनाका मनसेने बंद पाडला. याबाबत टोलनाका प्रशासनाने पोलिसांना कळविल्यानंतर पोलीस उपअधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली नाक्यावर बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अपघातात मृत्यू झालेल्या लक्ष्मीबाई यांच्या वारसांना नुकसानभरपाई देण्यात यावी, एका वारसाला टोलनाक्यावर नोकरीत सामावून घ्यावे, दुरुस्तीला त्वरित सुरुवात करण्यात यावी, अशी मागणी मनसे पदाधिकारी आणि भटाटे कुटुंबीयाच्या वतीने टोलनाका प्रशासनाकडे करण्यात आली. ही मागणी टोलनाका प्रशासनाने मान्य केल्यावर आंदोलन स्थगित करण्यात आले. या आंदोलनात मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप किर्वे, समाधान भागडे, शत्रू भागडे, बाळू सागर, प्रताप जाखीरे, भोलेनाथ चव्हाण सहभागी झाले होते.