धुळे : जिल्ह्यात दोन भीषण आणि धक्कादायक घटनांनी जनमानसात खळबळ उडाली आहे. एका घटनेत घरगुती वादाला कंटाळून विवाहितेने आपल्या दोन चिमुरड्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली, तर दुसऱ्या घटनेत एका महिलेवर गुंगीकारक औषध देऊन लैंगिक अत्याचार करत तब्बल ५९ लाख ९९ हजार ४०० रुपयांची खंडणी उकळल्याचे समोर आले आहे. दोन्ही प्रकरणांचा पोलिस तपास सुरू आहे.
धुळे तालुक्यातील निकुंभे शिवारात शुक्रवारी दुपारी दीड ते दोनच्या सुमारास गायत्री आनंदा वाघ-पाटील (वय २७ वर्षे) यांनी आपल्या मुलगा दुर्गेश (वय ६ वर्षे) आणि मुलगी दुर्वा (वय ३ वर्षे) यांच्यासह गाव शिवारातील गोशाळेकडील विहिरीत उडी घेतली. रोजच्या कौटुंबिक वादांमुळे नैराश्यातून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक माहितीवरून समजते.
विहिरीत ३० ते ४० फूट खोल पाणी असल्याने घटनेची लगेच कोणालाही कल्पना आली नाही. सायंकाळी तिघांचा शोध सुरू झाल्यावर जवळपास संशय निर्माण झाला आणि अखेर विहिरीत तिघांचे मृतदेह आढळून आले. घटनास्थळी पोलिसांचे पथक दाखल झाल्यावर तपासाची दिशा स्पष्ट झाली. मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी धुळे जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. सोनगीर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. गावात या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, धुळे शहर परिसरात एका महिलेला गुंगीकारक औषध देऊन लैंगिक अत्याचार करण्याचा आणि अत्याचाराचे चित्रीकरण समाज माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देत ५९ लाख ९९ हजार ४०० रुपये उकळण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडितेच्या तक्रारीनुसार सुकलाल रामभाऊ बोरसे (वय ५३, रा. विवेकानंद नगर, देवपूर) याने १७ ऑगस्ट २०२३ पासून पीडित महिलेशी ओळख वाढवून आर्थिक मदत करण्याचे आमिष दाखवले.
त्यानंतर पेढ्यातून गुंगी आणणारे औषध देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. अत्याचाराचे व्हिडिओ चित्रीकरण केले आणि ते सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देत पैशांची व शारीरिक संबंधांची जबरदस्ती केली. महिला मानसिक तणावाखाली गेल्याने अखेर तिने आपल्या वडिलांना संपूर्ण घटना सांगितली. त्यांच्या मदतीने तिने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.
या कालावधीत आरोपीने तब्बल ५९ लाख ९९ हजार ४०० रुपये तसेच ५ ते ६ कोरे धनादेश घेतल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपी सुकलाल बोरसे यास शुक्रवारी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. धुळे जिल्ह्यात अल्पावधीत दोन गंभीर घटनांनी नागरिकांमध्ये सुरक्षेबाबतची चिंता वाढवली आहे. पोलिसांनी दोन्ही प्रकरणांचा तपास वेगाने सुरू ठेवत आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.
