अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, डॉ. विजया वाड, डॉ. इंदिरा हिंदुजा यांसह ११ कर्तृत्ववतींना महिला दिनाच्या पाश्र्वभूमीवर येथील आयकॉन फाऊंडेशनच्या वतीने देण्यात येणारा ‘महाराष्ट्र कन्या गौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. महिलांच्या सर्वागीण उन्नतीसाठी प्रदीर्घ काळ कार्यासाठी दिला जाणारा महाराष्ट्र प्रबोधन जीवन गौरव पुरस्कार ७८ वर्षे महिला सबलीकरणाचे कार्य करणाऱ्या नाशिकच्या दांडेकर टेक्निकल इन्स्टिटय़ूटला जाहीर झाला आहे.
आयकॉन फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी महिला दिनाच्या निमित्ताने पुरस्कार जाहीर केले जातात. यंदा पुरस्कार जाहीर झालेल्यांमध्ये शेअर बाजारतज्ज्ञ सुचेता दलाल, ज्येष्ठ पत्रकार राही भिडे, समाजसेविका मीना रांका, चित्रा बलदोटा, उद्योगपती सीमा झांबड, माजी नगरसेविका राजुलताई पटेल, जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शकुंतला सिंग, जव्हार येथे अपंग पुनर्वसनाचे कार्य करणाऱ्या प्रमिला कोकड यांचाही समावेश आहे.
७ मार्च रोजी मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सेंटरच्या सभागृहात सायंकाळी ७.०० वाजता पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. या सोहळ्यास लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोज जोशी, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख, ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम, कादंबरीकार विश्वास पाटील, उद्योगपती किशोरभाई खाबिया आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती फाऊंडेशनचे संचालक मनोज वरंदळ यांनी दिली.