जायकवाडीसाठी गंगापूर धरणातून पाणी सोडल्यानेच नाशिकवर पाणीटंचाईचे संकट ओढवल्याची सातत्याने भाजपचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्य़ाचे पालकमंत्री गिरीश महाजन यांना आठवण करून देत महापालिकेतील सत्ताधारी मनसेने शनिवारपासून शहरात मोफत पाणीटँकर सेवा सुरू केली आहे. या उपक्रमासाठी अर्थसाह्य़ म्हणून मनसेच्या सर्व नगरसेवकांनी दोन महिन्यांचे मानधन देण्याचा निर्णय रविवारी पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला. शहरात सध्या आठवडय़ातून आवर्तनानुसार विभागवार एक दिवस पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे उद्भवलेल्या तांत्रिक अडचणींमुळे अनेक भागात पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. त्यावर उपाय म्हणून मनसेने शनिवारपासून सात टँकरद्वारे मोफत पाणी पुरविण्याची योजना सुरू केली आहे. पहिल्याच दिवशी टँकरने ३५ फेऱ्या केल्याची माहिती पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे. पाण्याची वाढती मागणी लक्षात घेत दोन टँकर अजून वाढविण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. टँकर उपक्रमावर चर्चा तसेच नवीन उपाययोजनांसंदर्भात चर्चा करण्यासाठी रविवारी सकाळी मनसेच्या राजगड या कार्यालयात पक्षाच्या सर्व नगरसेवकांची बैठक संपर्क नेते अविनाश अभ्यंकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. या बैठकीत मनसेच्या सर्व नगरसेवकांनी स्वयंस्फूर्तीने मोफत टँकर उपक्रमासाठी दोन महिन्यांचे मानधन देण्याचे ठरवून प्रत्येकाने मानधनाचे धनादेश जमा केले. नगरसेवकांचा आदर्श समोर ठेवत पक्ष पदाधिकाऱ्यांनीही शक्य ती मदत कार्यालयात जमा करण्यास सुरुवात केली असल्याची माहिती प्रवक्ते संदीप लेनकर यांनी दिली. भविष्यात टंचाई तीव्र झाल्यास अजून टँकर वाढवावे लागणार असून सर्वत्र टँकर पोहोचविण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. नाशिककरांनी आपल्या सूचना पक्षाकडे ०२५३-२३१७७७८ या क्रमांकावर कळविण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. दरम्यान, महापालिका प्रशासनाने शहरात विभागवार वेगवेगळ्या दिवशी पाणीपुरवठा बंद करण्याऐवजी संपूर्ण शहरात दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय रविवारी घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onMSNMSN
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Msn financial help for free tankers activities
First published on: 07-03-2016 at 02:02 IST