लोकसत्ता प्रतिनिधी
जळगाव: शहरातील विविध भागांतील मुख्य रस्त्यांसह गांधी व्यापारी संकुल, रेल्वेस्थानक परिसर, तसेच चौकाचौकांत वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या विक्रेत्यांच्या १५ ते २० टपऱ्यांसह हातगाड्याही जप्त करण्यात आल्या.
फेरीवाल्यांनी पदपथांसह रस्तेही अडविल्याने महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभागातर्फे पदफेरीवाल्यांविरोधात धडक कारवाई हाती घेण्यात आली असून, त्यासाठी विभागातर्फे उपायुक्त गणेश चाटे, विभागप्रमुख संजय ठाकूर, उमाकांत नश्ते, साजीद अली, संजय पाटील, सतीश ठाकरे यांच्या नेतृत्वात चार पथके नियुक्त करण्यात आली आहे. प्रत्येक पथकात १२ ते १५ कर्मचारी आहेत.
हेही वाचा… केळी उत्पादकांच्या समस्या सोडवा; जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना साकडे
विभागाच्या कर्मचाऱ्यांनी विक्रेत्यांना हातगाड्या न लावण्याबाबत सक्त सूचना दिल्या होत्या. शुक्रवारी अतिक्रमण निर्मूलन विभागातर्फे रेल्वेस्थानक परिसर, महात्मा गांधी व्यापारी संकुल, पांडे चौक, जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसर आदी भागांत धडक मोहीम राबवून वाहतुकीस अडथळा ठरणार्या रस्त्याच्या कडेला लावलेल्या विक्रेत्यांच्या टपऱ्यांसह हातगाड्या जप्तीची कारवाई करण्यात आली. शुक्रवारच्या कारवाईत तीन-चार ट्रॅक्टर भरून अतिक्रमित साहित्य जप्त केले असल्याचे ठाकूर यांनी सांगितले. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरातील रस्त्यांवर अनधिकृत लागणाऱ्या हातगाड्यांची तक्रार आल्यानंतर जिल्हाधिकार्यांच्या सूचनेनुसार तेथे कारवाई करीत रस्ता मोकळा केला.