६० मुलींच्या शिक्षणाचा मार्ग सुकर, समाजाचाही मदतीचा हात

नाशिक : मुलांच्या उज्वल भविष्यासाठी उच्च शिक्षण घेणे खूप आवश्यक असते. गरीब कुटुंबातील आणि  करोनामुळे आर्थिक विवंचनेत असलेल्या पालकांची परिस्थिती  सध्या अजूनच वाईट झाली आहे. त्यातही मुलगी असल्यामुळे दुर्लक्षित झालेल्या अनेक विद्यार्थिनी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. यामुळे व्यथित झालेल्या नाशिक महापालिका शाळा क्रमांक १८ (आनंदवल्ली) येथील शिक्षिका कु ंदा बच्छाव-शिंदे यांनी ‘शैक्षणिक पालकत्व’उपक्र म सुरू के ला आहे. या  माध्यमातून ६० मुलींना शैक्षणिक पालकत्व लाभले आहे.

शाळेतील आठवीपर्यंत शिक्षण घेऊन गेलेल्या विद्यार्थिनी पुढे पदवीपर्यंत शिकून नोकरी व्यवसाय करून स्वावलंबी तर होत नाहीच, उलट शिक्षण मध्येच सोडून कमी वयातच त्यांचे लग्न लावून दिले जात असल्याचे चित्र त्यांना दिसले. शिक्षण बंद होण्याची कारणे शोधल्यावर त्यातील मुख्य कारण घरची बिकट आर्थिक परिस्थिती आणि यातून विद्यार्थिनींची शिक्षणातील गळती आणि बालविवाह या समस्या दिसून आल्या. अशा विद्यार्थिनींना शैक्षणिक पालकत्व देवून त्यांची शैक्षणिक जबाबदारी उचलण्याचे ठरवले आणि सुरुवातीला त्यांनी स्वत: तीन विद्यार्थिनी आणि त्यांचे पती किरण शिंदे यांनी एक विद्यार्थिनी शिक्षणासाठी दत्तक घेतली. पण त्यांच्या सभोवती अशा अनेक हुशार व गरजू विद्यार्थिनी होत्या. ज्यांना शिकण्याची जिद्द होती. परंतु, आर्थिक परिस्थितीमुळे त्यांचे शिक्षण बंद होण्याची वेळ आली होती. या विद्यार्थिनींना शैक्षणिक मदतीची गरज होती. अशा विद्यार्थिनीसाठी मदत म्हणून त्यांनी शैक्षणिक पालकत्व. एक हात मदतीचा हे अभियान सामाजिक स्तरावर मोठय़ा पातळीवर राबवायचे ठरवले.

बच्छाव यांना त्यांच्या अभियानात त्यांची मैत्रिण शिक्षिका वैशाली भामरे-ह्यळीज यांची साथ मिळाली. त्यांनीही दोन विद्यार्थिनीना शिक्षणासाठी दत्तक घेतले. मनपा शिक्षक प्रशांत पाटील हेही या अभियानास जोडले गेले. या सर्वानी हे अभियान मोठय़ा स्तरावर राबवून जास्तीत जास्त विद्यार्थिनीना समाजातून मदत मिळवून द्यायचे ठरवले.

समाज माध्यमाचा वापर करत समाजातून या विद्यार्थ्यांंना शिक्षणासाठी मदत करण्याचे आवाहन केले. त्यांच्या या विनंतीवजा आवाहनाला समाजातून भरभरून प्रतिसाद मिळाला.

जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पाच विद्यार्थिनी, पुंजाराम लिपटे यांनी पाच विद्यार्थिनी, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विलास शिंदे आदींनी पुढे येत विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक पालकत्व दिले. त्याचबरोबर रोटरी क्लब ऑफ नाशिक यांनी आठ विद्यार्थिनी, नयना गांगुर्डे यांच्या पुढाकाराने ‘इनरव्हील क्लब जेन नेक्स्ट, नाशिक’ यांनी २० विद्यार्थ्यांंची पुढील चार वर्षांसाठी शिक्षणाची जबाबदारी घेवून त्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले. रणरागिणी मराठा ग्रुप यांनीही काही गरजू विद्यार्थिनीना शैक्षणिक साहित्य वाटप केले.