नंदुरबार : जिल्ह्यात कुपोषण आणि आरोग्य सेवांची स्थिती सुधारण्यासाठी राज्य सरकार विशेष प्रयत्न करत असून स्थानिक आमदार आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर जिल्ह्यातील दुर्गम भागात दौरा करण्यात आला. जिल्ह्यातील कुपोषण समस्या आणि आदिवासी क्षेत्रातील आरोग्य सेवेत कृती दलाच्या माध्यमातून सुधार करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर यांनी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत केले.
बैठकीस आमदार आमश्या पाडवी, आमदार राजेश पाडवी, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस, प्रकल्प अधिकारी अनय नावंदर (तळोदा), आरोग्य उपसंचालक (नाशिक विभाग) डॉ. कपिल आहेर, प्रकल्प अधिकारी (नंदुरबार) चंद्रकांत पवार, आरोग्य निवासी उपजिल्हाधिकरी कल्पना ठुबे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनय सोनवणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र सोनवणे आदी उपस्थित होते.
नंदुरबार जिल्ह्यातील सिकलसेल, कुपोषण आणि आदिवासी भागातील आरोग्याच्या समस्या कमी करण्यासाठी कृती दलाची स्थापना करण्यात आली असून या दलाचे अध्यक्ष स्वतः जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील आरोग्यसेवा सुधारण्यासाठी काम केले जाईल. आरोग्य मंत्र्यांनी केलेल्या दौऱ्यात रुग्णवाहिका १०८ सेवेबाबतच्या तक्रारींची दखल घेऊन जिल्हाधिकारी यांच्याकडून अहवाल मागविण्यात आला आहे. तक्रारींवर तत्काळ कारवाई केली जाईल. जुन्या रुग्णवाहिका बदलून नवीन रुग्णवाहिका घेण्यासाठी निविदा काढण्यात आल्या असून, ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरपर्यंत नवीन रूग्णवाहिका उपलब्ध होतील. दुर्गम भागांमध्ये रुग्णवाहिका उपलब्ध करण्यावर विशेष लक्ष दिले जाईल, असे त्यांनी बैठकीत सांगितले.
आरोग्य सेवेवर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक मतदारसंघात एक व्हॉट्सॲप गट तयार केला जाणार आहे. या गटात आमदार, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हाधिकारी यांचा समावेश असेल. या माध्यमातून रुग्णालयांमधील स्वच्छता आणि औषधांच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवले जाईल. तसेच रुग्णालयांमध्ये अस्वच्छता आढळल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. औषध खरेदीमध्ये गुणवत्ता राखण्यावरही भर दिला जाईल. आरोग्य सेवेच्या हलर्गीमुळे रुग्ण दगावल्यास जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी. जिल्ह्यात सिकलसेलची समस्या खूप गंभीर असल्याने त्यासाठी गांभीर्यपूर्वक व संवेदनशीलतेने काम करावे, असे आवाहन मंत्री आबीटकर यांनी केले. यावेळी आमदार राजेश पाडवी यांनी, आरोग्य अधिकारी-कर्मचारी यांची रिक्त पदे त्वरीत भरावीत, कर्मचारीवर्ग वाढवावा, अशी मागणी केली. आमदार आमश्या पाडवी यांनी, शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थी आजारी पडल्यास त्याला त्याच्या घरी न सोडता सर्वप्रथम दवाखान्यात दाखल करावे, अशी सूचना केली.
