नाशिक – जिल्ह्यातील नाशिक-वणी रस्त्यावर बुधवारी रात्री मोटार-दुचाकीची समोरासमोर धडक झाल्यानंतर मोटार लगतच्या नाल्यात कोसळली. अपघातग्रस्तांना बाहेर पडता न आल्याने पाण्यात बुडून सात जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन पुरूष, तीन महिला आणि लहान बाळाचा समावेश आहे. मृत झालेले सर्व जण दिंडोरी तालुक्यातील रहिवासी आहेत.
नाशिक-वणी रस्त्यावरील दिंडोरी बाजार समितीसमोर हा अपघात झाल्याची माहिती नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली. दिंडोरी तालुक्यातील एका कुटूंबातील काही जण मुलाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी मोटारीने नाशिकला आले होते. बुधवारी रात्री ते परत गावी निघाले असता रात्री एक वाजता हा अपघात झाला. दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर मोटार आली असता समोरुन येणाऱ्या दुचाकीशी समोरासमोर धडक झाली. या अपघातानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने मोटार रस्त्यालगतच्या नाल्यात उलटली. मोटारीतील कुणालाही बाहेर पडता आले नाही. नाकातोंडात पाणी गेल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
या अपघातात मोटारीतील देविदास गांगुर्डे (२८, सारसाळे), मनिषा गांगुर्डे (२३, सारसाळे), उत्तम जाधव (४२, कोशिंबे), अलका जाधव (३८, कोशिंबे), दत्तात्रेय वाघमारे (४५, देवपूर, देवठाण), अनुसया वाघमारे (४०, देवपूर, देवठाण), भावेश गांगुर्डे (दोन) यांचा मृत्यू झाला. दुचाकीवरील मंगेश कुरघडे (२५), अजय गोंद (१८, रा. जव्हार, पालघर, सध्या सातपूर, नाशिक) हे जखमी झाले. त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, रात्रीची वेळ आणि महामार्गावर वर्दळ कमी असल्याने अपघात झाल्याचे आणि नाल्यात मोटार पडल्याचे कुणाच्या लक्षात आले नसल्याचे सांगितले जाते. जखमींपैकी कोणीतरी पोलीस ठाण्यात माहिती कळविल्यानंतर यंत्रणा सक्रिय झाली. या प्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.