नाशिक – प्रयागराज कुंभमेळ्यात ४६ दिवसांत ५.६ लाख प्रवाशांनी ५२२९ विमानांद्वारे प्रवास केला होता. कुंभमेळ्यासाठी तेथील विमानतळावरील विविध सोयी सुविधांचा विस्तार करण्यात आला. टर्मिनलची पुनर्रचना करुन गर्दीच्या वेळची प्रवासी हाताळणीची क्षमता ५४० वरून दुप्पट नेण्यात आली. १६२० प्रवाशांसाठी नवीन टर्मिनल कार्यान्वित करण्यात आले. प्रयागराज कुंभमेळ्यातील अनुभव लक्षात घेऊन नाशिक विमानतळावर नवीन प्रवासी टर्मिनल उभारण्याची मागणी पुढे आली आहे. परदेशी प्रवासासाठी तपासणी (इमिग्रेशन) केंद्र मंजूर झाल्यास कुंभमेळ्यात नाशिक विमानतळाचा वापर आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतुकीसाठी करता येणार आहे.
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अर्थात एचएएलने नाशिक विमानतळावर नवीन प्रवासी टर्मिनल उभारण्याची मागणी केली आहे. त्यानुसार एचएएलने १० हजार चौरस मीटर नवीन प्रवासी टर्मिनल (१५० कोटी), पर्यायी टॅक्सी संलग्न रस्ता आणि अतिरिक्त वाहनतळ अशी एकूण १८५ कोटींची कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत प्रस्तावित केली आहेत. अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी हा विषय मुख्यमंत्री तथा नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा शिखर समितीचे अध्यक्ष तथा देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर निवेदनाद्वारे मांडला.
२०२७ मध्ये होणाऱ्या कु्ंभमेळ्यात कोट्यवधी भाविक आणि पर्यटक येणे अपेक्षित आहेत. त्यादृष्टीने नाशिक परिसरात दळणवळण, परिवहन सुविधेचे नियोजन महत्त्वाचे् आहे. भविष्यातील विमानसेवेची गरज पाहता उड्डाण क्षमता वाढविण्यासाठी एचएएलने सध्या अस्तित्वात असलेल्या धावपट्टीला समांतर नवीन धावपट्टी मंजूर केलेली असून ३४३ कोटींची निविदा प्रसिद्ध केली आहे. प्रयागराजच्या धर्तीवर नाशिक विमानतळावर पायाभूत सुविधांची उभारणी, नवीन टर्मिनल प्रकल्प बांधकाम विभागाकडे सोपविणे याकडे भुजबळ यांनी लक्ष वेधले आहे.
प्रयागराज विमानतळावरील बदल
महाकुंभ नियोजनात प्रयागराज विमानतळाच्या आधुनिकीकरणात टर्मिनल क्षेत्र ६७०० चौरस मीटरहून २५ हजार ५०० चौरस मीटरपर्यंत वाढविण्यात आले. जुन्या टर्मिनलची पुनर्रचना करुन गर्दीच्या वेळी प्रवासी हाताळण्याची क्षमता दुप्पट करण्यात आली. नवीन टर्मिनलची उभारणी, विमानतळावरील वाहतळाची क्षमता २०० वरून ६०० वाहनांपर्यंत वाढली. तिकीट तपासणी कक्ष आठवरून ४२ पर्यंत वाढले. विमानतळावरील दरवाजे चारवरून ११ पर्यंत वाढले. अतिरिक्त एरोब्रिज, दरवाजात जोडलेल्या मेटर डिटेक्टरसह अधिक सुरक्षा सुविधा जोडल्या गेल्या, याकडे मंत्री छगन भुजबळ यांनी लक्ष वेधले आहे.
छगन भुजबळ यांची सूचना
नाशिक येथे हॉपिंग विमानांची संख्या वेगाने वाढत असून यामुळे अतिरिक्त संपर्क व्यवस्था उपलब्ध होत आहे. आगामी कुंभमेळा नियोजनात नाशिक विमानतळावर इमिग्रेशन तपासणी केंद्र (परदेशी प्रवासासाठी) तातडीने मंजूर करण्याची मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे. राज्य शासनालाही कुंभमेळ्यात नाशिक विमानतळाचा वापर आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतुकीसाठी करता येईल. ज्यासाठी अतिरिक्त भांडवली गुंतवणुकीची गरज पडणार नसल्याकडे भुजबळ यांनी लक्ष वेधले,