नाशिक : कांदा दरात सुरू असलेल्या घसरणीचे पडसाद स्थानिक पातळीवर उमटत असून शनिवारी येवला येथे संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडत मनमाड-येवला रस्त्यावर तासभर आंदोलन केले.आठवडाभरापासून कांद्याचे दर घसरत आहेत. लाल कांद्याची आवक वाढत असताना देशांतर्गत मागणी कमी झाली. २० टक्के शुल्कामुळे निर्यातीला चालना मिळत नाही. या स्थितीत काही दिवसात कांदा दरात दोन हजारहून अधिकने घसरण झाली. दोन दिवसांपूर्वी लासलगाव बाजार समितीत संतापलेल्या शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले होते.

शनिवारी त्याची पुनरावृत्ती येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत झाली. कांद्याला केवळ १५०० ते १६०० रुपये क्विंटल भाव जाहीर झाल्याने शेतकरी संतापले. छावा संघटना आणि शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले. नंतर येवला-मनमाड रस्त्यावर धाव घेऊन ठिय्या दिला.

हेही वाचा…माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे नाशिक, त्र्यंबकेश्वरात देवदर्शन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रास्तारोको आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णत: ठप्प झाली. कांद्यावरील २० टक्के निर्यातशुल्क रद्द करावे, शेतकऱ्यांना २५ रुपये किलोप्रमाणे अनुदान आणि नाफेड व एनसीसीएफने खरेदी केलेल्या कांद्यातील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. मागण्यांचे निवेदन पोलिसांना दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.