नाशिक – भाजपने काही दिवसांपूर्वी संपूर्ण राज्यातील जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षांची घोषणा करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक तयारीला वेग दिला. यात नाशिक जिल्हा मात्र अपवाद ठरला. स्थानिक पातळीवरील नियुक्ती रखडण्यामागे पक्षाकडून नव्या चेहऱ्याचा शोध सुरू असल्याचे बोलले जाते. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत शनिवारी रात्री प्रमुख स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी त्यांनीही लवकरच या पदांची घोषणा केली जाईल, असे सूचित केले.
राज्याचे महसूलमंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे शनिवारी नाशिक दौऱ्यावर होते. विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात त्यांनी दिवसभर बैठका घेतल्या. रात्री उशिरा ते वसंत स्मृती या भाजप कार्यालयात पोहोचले. या ठिकाणी प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, आ. सीमा हिरे, आ. राहुल आहेर, माजीमंत्री डॉ. भारती पवार, ज्येष्ठ नेते विजय साने, जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, शहराध्यक्ष प्रशांत जाधव अशा काही निवडक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.
संपूर्ण राज्यातील शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर होऊन पंधरवडा उलटण्याच्या मार्गावर आहे. अद्याप नाशिक शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्षांच्या नांवावर शिक्कामोर्तब होऊ शकलेले नाही. या पार्श्वभूमीवर, ही बैठक झाली. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा कार्यक्रम लवकर जाहीर होईल. या निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना बावनकुळे यांनी दिल्या. या निवडणुका कार्यकर्त्यांसाठी महत्वाच्या आहेत. गाव पातळीवरील लोक भाजपशी जोडले गेले पाहिजेत, असे त्यांनी सूचित केल्याचे उपस्थितांकडून सांगण्यात आले.
राज्यात आधी पक्षाच्या ज्या नियुक्त्या जाहीर झाल्या, त्यात ७० ते ८० टक्के विद्यमान पदाधिकाऱ्यांना पुन्हा संधी दिली गेली. स्थानिक पातळीवर विद्यमानांना बदलायचे असे काही नसल्याचे ते म्हणाल्याचा दाखला काहींनी दिला. पुढील पाच ते सात दिवसांत अंतिम निर्णय होऊन नाशिकच्या नियुक्त्या जाहीर होतील, असे बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले. नाशिक शहराध्यक्ष आणि काहीअंशी जिल्हाध्यक्ष पदासाठी नवीन चेहऱ्यावर विचार होत असल्याने विलंब झाल्याचे काही जण सांगतात.