नाशिक : शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निंदाजनक काव्य करून त्यांची बदनामी केल्याप्रकरणी मनमाड पोलीस ठाण्यात कुणाल कामराविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे कामराच्या समर्थनार्थ भारतीय जननाट्य संघाची नाशिक शाखाही मैदानात उतरली आहे.

शिंदे गटाचे शहरप्रमुख मयूर बोरसे यांनी शिवसैनिकांसह मनमाड पोलीस ठाण्यात दाखल होत कामराविरुध्द रितसर तक्रार दिली. कामराने मुंबईतील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नैतिक आचरणावर निंदाजनक काव्य करून त्यांची बदनामी केली. तसेच दोन राजकीय पक्षात द्वेषभावना उत्पन्न केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून मनमाड पोलिसांनी कामरा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. नंतर हा गुन्हा मुंबईतील खार पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही तर हुकूमशाही

विनोदकार कुणाल कामरा यांचा कार्यक्रम झालेल्या हॉटेलची तोडफोड ही फुटकळ गुंडगिरी नसून ती राज्यसंस्थेच्या आशीर्वादाने चालणारा हुकूमशाहीचा कार्यक्रम आहे. सत्ताधाऱ्यांना टीका पचत नसल्याने त्यांनी आता हिंसेचा आणि दहशतीचा आधार घेतला आहे. ही लोकशाही नव्हे तर, सत्तेच्या ताब्यात गेलेली गुंडशाही असल्याचे टिकास्त्र भारतीय जननाट्य संघाच्या नाशिक शाखेने (इप्टा) सोडले आहे. संस्थेचे अध्यक्ष तल्हा शेख यांनी दिलेल्या या निवेदनात कलाकार व जनता गप्प बसणार नाही, असे म्हटले आहे. या फॅसिस्ट हल्ल्याचे कलेच्या माध्यमातून सडतोड उत्तर दिले जाईल. हा लढा केवळ कुणाल कामराचा नाही, तर तो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आहे. कायदा आणि सुव्यवस्था लोकांचे हक्क दडपण्यासाठी नव्हे, तर गुंडांना गजाआड टाकण्यासाठी असते, याकडे निवेदनातून संघाने लक्ष वेधले आहे.