नाशिक – कधीकाळी महाराष्ट्रातील प्रसिध्द साखर कारखान्यांमध्ये गणना होणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील निफाड सहकारी साखर कारखान्याला वाईट दिवस आले आहेत. आता या कारखान्याची नाशिक जिल्हा बँक विक्री करणार असल्याची जोरदार चर्चा सुरु झाल्याने कारखाना सभासद आणि कामगारांनी त्याविरोधात एकजूट दाखविण्यास सुरुवात केली आहे.
नाशिक जिल्ह्यातील सर्वात समृध्द तालुका अशी ओळख असलेल्या निफाडच्या विकासात आणि राजकारणात निसाकाची कामगिरी मोलाची ठरली आहे. निसाकावर ज्याची सत्ता, त्याचा आमदारकीचा मार्ग मोकळा, असे सोपे समीकरण काही वर्षांपूर्वीपर्यंत होते. परंतु, आता सर्वच बदलले आहे. राजकारणाची दिशा बदलली आणि निसाकाची दशा झाली.
सध्या कारखाना विक्रीची तयारी सुरु झाल्याच्या चर्चेने सभासद आणि कामगार काळजीत पडले आहेत. राज्य बियाणे उपसमितीचे माजी सदस्य तथा करंजगावचे माजी सरपंच खंडू बोडके पाटील यांच्यासह कामगारांच्या शिष्टमंडळाने नाशिक जिल्हा बँकेत प्रशासक संतोष बिडवई यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत निसाकाची विक्री करण्यास सभासद आणि कामगारांचा तीव्र विरोध असल्याचे पाटील यांनी प्रशासक बिडवई यांच्या लक्षात आणून दिले.
नाशिक जिल्हा बँकेचे प्रशासक बिडवई आणि निसाकाचे अवसायक हिरे यांनी यावेळी शिष्टमंडळाला निसाका विक्रीबाबत सुरू असलेल्या कायदेशीर कारवाईची माहिती दिली. २०१७ पासून सरफेसी ॲक्टनुसार जिल्हा बँकेकडे निसाकाचे सर्वाधिकार आहेत. जिल्हा बँकेने बी. टी. कडलग कंपनीला निसाका भाडेकराराने चालविण्यास दिला. मात्र तीन हंगाम उलटूनही त्यांनी कारखाना सुरू न करता उलट राजकीय आश्रयाने त्यातील कोट्यवधीची सामग्री विक्री केल्याचा आरोप पाटील यांनी बैठकीत केला.
कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष प्रमोद गडाख, सरचिटणीस बी. जी. पाटील यांनीही कारखाना विक्रीस कामगारांचा विरोध असल्याचे सांगत सुमारे ८१ कोटी रुपये कामगारांची देणी कोण देणार, असा प्रश्न प्रशासक बिडवई यांना केला. प्रशासक बिडवई यांनी, शुष्क बंदरासाठी (ड्रायपोर्ट) १०८ एकर जमीन विक्रीतून जिल्हा बँकेला मिळणाऱ्या १०५ कोटीपैकी ७६ कोटी रुपये व्याज व मुद्दलपोटी प्राप्त झाले. मात्र तरीही ६५ कोटी रुपये अद्याप बँकेला प्राप्त झालेले नसल्याचे सांगितले.
भाडेकरार केलेल्या कडलग कंपनीने उलट कोट्यवधी रुपये नुकसानभरपाईची मागणी केली आहे. जिल्हा बँकेने कायदेशीररित्या निसाका विक्रीची कार्यवाही सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. माजी आमदार अनिल कदम यांनीही जिल्हा बँकेचे प्रशासक बिडवई यांच्याशी व्हिडिओद्वारे संवाद साधला. कामगारांच्या शिष्टमंडळाने यावेळी माजी आमदार अनिल कदम यांचीही भेट घेत व्यथा मांडली. बैठकीस सभासद प्रतिनिधी खंडू बोडके पाटील, निसाका कामगार संघटनेचे सरचिटणीस बी. जी. पाटील, कार्याध्यक्ष प्रमोद गडाख, पिंपळसचे माजी सरपंच तानाजी पूरकर, नितीन निकम, संघटनेचे उपाध्यक्ष सुभाष झोमण, खजिनदार बाळासाहेब बागस्कर, चिटणीस नवनाथ गायकवाड आदी उपस्थित होते.