नाशिक : करोनाच्या दुसऱ्या लाटेत नियोजन, व्यवस्थापन आणि हाताळणीबाबतची माहिती गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ राज्यातील ६० जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून घेतली. करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी काही जिल्ह्यात नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले गेले. त्याची माहिती पंतप्रधानांनी जाणून घेतली. वेळेच्या मर्यादेमुळे पंतप्रधानांना पाच ते सहा जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधता आला. महाराष्ट्रातून नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना ही संधी मिळाली. या कार्यक्रमात नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे हे सहभागी झाले असले तरी त्यांना थेट पंतप्रधानांशी संवाद साधता आला नाही.
पंतप्रधान मोदी यांनी ११ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या राज्यातील ६० जिल्हाधिकाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ शिंह, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आदी उपस्थित होते. या संवादात नाशिकसह नागपूर, अहमदनगर, बुलढाणा, चंद्रपूर, सातारा, बीड, परभणी, सांगली आदी १७ जिल्ह्यातील जिल्हाधिकारी सहभागी झाले होते. पंतप्रधान कार्यालयाने या कार्यक्रमात प्रत्येक राज्यातून एकाच जिल्हाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष संवादासाठी निवड केली होती. महाराष्ट्रातून नगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची निवड झाली होती. त्यांच्याशी थेट संवाद साधत पंतप्रधानांनी माहिती घेतली.
या कार्यक्रमात निवड झालेले सर्व जिल्हाधिकारी सहभागी झाले. परंतु, त्यांना थेट प्रत्यक्ष पंतप्रधानांशी संवाद साधता आला नाही. यात नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांचाही समावेश होता. या कार्यक्रमात ज्या ज्या चांगल्या उपक्रमाविषयी चर्चा झाली, ते सर्व आपण नाशिकमध्ये राबवित आहोत. यामध्ये जनतेचा सहभाग, आपत्कालीन कार्यकक्ष, करोना पश्चात काळजी केंद्र, तिसऱ्या लाटेसाठी बालरोगविषयक तज्ज्ञांची समिती, म्युकरमायकोसिसची पूर्वतयारी आदींचा समावेश होता. ज्यावर आपण आधीपासून काम सुरू केले आहे, असे जिल्हाधिकारी मांढरे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
हा कार्यक्रम म्हणजे आढावा बैठक नव्हती. वेगवेगळ्या जिल्ह्यात करोना हाताळणीसाठी कोणकोणते नवीन उपक्रम राबविले गेले, या संदर्भातील माहितीची देवाण-घेवाण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू होता. वेळेची मर्यादा असल्याने पाच-सहा जिल्हाधिकारी यांनी या चर्चेत सहभाग घेतला. महाराष्ट्रातील कामकाजाची माहिती नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. जिल्हास्तरीय सर्व यंत्रणा वर्षभरापासून ज्या पध्दतीने अहोरात्र काम करीत आहे, या संकटावर मात करण्यासाठी प्रयत्नशील आहे, याबाबत पंतप्रधानांनी कौतुकपूर्ण दखल घेतली. आगामी तिसऱ्या लाटेसाठी सर्वानी तयारी करावी आणि हे संकट जसे अभूतपूर्व आहे तसेच आपले कामही अभूतपूर्व राहील, असा प्रयत्न सर्वजण करतील याची खात्री व्यक्त करून सर्वाचे मनोबल उंचावले.
– सूरज मांढरे (जिल्हाधिकारी, नाशिक)