नाशिक – जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये आतापर्यंत सरासरीपेक्षा अधिक पाऊस होऊनही आठ तालुक्यातील १४२ गाव-वाड्यांची टंचाई दूर झालेली नाही. टँकरद्वारे संबंधित ठिकाणी पाणी पुरविले जात आहे. तर ४४ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेल्या मालेगावसह आठ तालुक्यांतील सुमारे ८४ हजार नागरिकांची तहान आजही टँकरवर अवलंबून आहे.
जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून एक ते २४ जून या कालावधीत जिल्ह्यात सरासरी १८२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या कालावधीतील सर्वसाधारण १३९ मिलीमीटर पावसापेक्षा यंदा अधिक आहे. गेल्या वर्षी सरासरी ११६ मिलीमीटर पाऊस झाला होता. यंदा त्यापेक्षा कितीतरी अधिक पाऊस झाला. इगतपुरी आणि मालेगाव या दोन तालुक्यांचा अपवाद वगळता उर्वरित १३ तालुक्यांत वार्षिक सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस झाल्याची आकडेवारी आहे.
या परिस्थितीत ४५ गावे आणि ९७ वाड्यांना टँकरने पाणी पाणी द्यावे लागत आहे. बागलाण तालुक्यात (एक), चांदवड (आठ), देवळा (दोन), कळवण (नऊ), मालेगाव (४६), नांदगाव (३६), सिन्नर (३४) आणि येवला तालुक्यात सहा ही टँकरने पाणी पुरवठा करणाऱ्या गाव-वाड्यांची संख्या आहे. याशिवाय गावांची तहान भागविण्यासाठी प्रशासनाने १९ विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. तसेच टँकरसाठी २५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आल्याचे प्रशासनाच्या अहवालात म्हटले आहे.
सात तालुके टँकरमुक्त
जिल्ह्याच्या आठ तालुक्यातील १४२ गावांना एकूण ३४ टँकरच्या ७९ फेऱ्या मंजूर आहेत. सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेल्या मालेगाव तालुक्यात टँचाईगस्त गावांची संख्या सर्वाधिक ४६ इतकी आहे. त्याखालोखाल नांदगावचा (३६) समावेश आहे. दिंडोरी, इगतपुरी, नाशिक, निफाड, पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर हे सात तालुके मात्र टँकरमुक्त झाले आहेत.