नाशिक – राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमातंर्गत २०२५ वर्षात नाशिक जिल्हा सर्वात जास्त ग्राम पंचायत क्षयरोगमुक्त करून राज्यात अग्रस्थानी राहिला आहे.
२०२५ अखेरपर्यंत देशातून क्षयरोग हटविण्याचे लक्ष आहे. यासाठी राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून २०२३ पासून जिल्ह्यात क्षयरोगमुक्त ग्रामपंचायत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील एक हजार ३८४ पैकी ७२ ग्रामपंचायतींना रौप्य, ३२४ ग्रामपंचायतींना कांस्य अशा एकूण ३९६ ग्रामपंचायती क्षयरोग मुक्त म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्राम पंचायती क्षयरोगमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागूल, डॉ. दीपक लोणे, डॉ. युवराज देवरे आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. रवींद्र चौधरी यांनी नियोजन केले.
आरोग्य विभागाच्या वतीने लोकसहभाग वाढविण्यासाठी जिल्ह्यात १०० दिवसीय प्रधानमंत्री टीबीमुक्त भारत अभियान राबविण्यात आले. जिल्ह्यातील १५ तालुक्यातील क्षयरोग केंद्रातून ३०० थुंकी नमुने गोळा करण्याचे मासिक उद्दिष्ट असताना जानेवारीत ४०५ म्हणजे १११ टक्के, फेब्रुवारीत ३१९ म्हणजे १०६ टक्के तर मार्च महिन्यात ३२४ म्हणजे १०८ टक्के असे थुंकी नमुने जमा करण्यात आले.
क्षयरोग हा एक गंभीर संसर्गजन्य रोग असून तो जीवाणूमुळे होतो. योग्य निदान, वेळेवर उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांद्वारे आपण क्षयरोगाचा समूळ नायनाट करू शकतो. योग्य माहिती, वेळीच तपासणी आणि पूर्ण उपचाराने आपण हा आजार हद्दपार करू शकतो. – डॉ. सुधाकर मोरे ( जिल्हा आरोग्य अधिकारी, नाशिक)