नाशिक : शुक्रवारपासून श्रावण महिन्याला सुरूवात होत असून या महिन्यात शिवपूजा अधिक महत्वाची मानली जात असल्याने या अनुषंगाने जिल्ह्यात श्रावणी सोमवारसाठी विशेष नियोजन करण्यात येत आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे श्रावणातील सर्वच सोमवारी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून सीसीटीव्ही, सुरक्षारक्षक ही व्यवस्था करण्यात आली आहे.

श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळाच्या वतीने श्रावणमास २०२५ चे नियोजन पूर्ण करण्यात आले. श्रावण महिन्यात भाविकांना पूर्व दरवाजा येथे कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी वातानुकूलित दर्शन बारीची व्यवस्था आहे. यामुळे हजारो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी उभे राहु शकतील. तसेच दर्शन रांगेत ज्येष्ठ मंडळीना बसण्यासाठी व्यवस्था, स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष, पिण्याचे शुध्द पाणी, या व्यवस्थेसह प्राथमिक आरोग्य कक्ष तयार करण्यात आला आहे.

श्रावणात त्र्यंबकेश्वर मंदिरात होणारी गर्दी पाहता परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मंदिर हे भाविकांना दर्शनासाठी पहाटे पाच ते रात्री नऊ या वेळेत उघडे ठेवण्यात येणार आहे. प्रत्येक श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांना दर्शनासाठी उघडण्याची वेळ पहाटे चार राहणार आहे. स्थानिकांना दर्शन वेळ सकाळी मंदिर उघडल्यापासून ते १० वाजेपर्यंत आणि सायंकाळी सहा ते रात्री आठ अशी राहणार आहे. स्थानिकांना दर्शनासाठी येतांना स्थानिक असल्याचा पुरावा म्हणून ओळखपत्र आणणे बंधनकारक राहणार आहे. स्थानिकांना उत्तर महाद्वारातून प्रवेश दिला जाईल. धर्मदर्शन रांग पूर्व दरवाजा आणि देणगी दर्शन रांग उत्तर दरवाजा येथून राहील. गर्भगृह दर्शन सर्व भाविकांसाठी बंद राहणार आहे. श्रावण काळात ऑनलाईन देणगी दर्शनाविषयी मंदिर देवस्थानच्या वतीने अद्याप भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही.

श्रावणात भाविकांची होणारी गर्दी पाहता देवस्थानच्या वतीने मंदिर सुरक्षा रक्षक, सीसीटीव्ही तसेच पोलिसांचा बंदोबस्त या त्रिसूत्रीवर भाविकांची सुरक्षा अवलंबून आहे. त्र्यंबक पोलिसांच्या वतीने देवस्थान परिसरात अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. सोमवारी ब्रह्मगिरी प्रदक्षिणा मार्गावरही पोलिसांची गस्त राहणार आहे. त्र्यंबक प्रशासनाच्या वतीने ब्रह्मगिरी प्रदक्षिणा मार्गावर स्वच्छतेसह पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. आरोग्य विभागाकडूनही बाहेरून येणाऱ्या भाविकांसह तसेच पर्यटकांच्या आरोग्य तपासणीसाठी कक्ष लावण्यात येणार आहे. राज्य परिवहन महामंडळाकडून बस फेऱ्यांचे नियोजन अंतिम टप्पात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोमवारी गर्दी वाढण्याची शक्यता

त्र्यंबकेश्वर येथील श्री संत निवृत्तीनाथ देवस्थानच्या वतीने पंढरपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त होणाऱ्या यात्रौत्सवासाठी पालखी गेली होती. ही पालखी रविवारी त्र्यंबकेश्वर येथे दाखल होत आहे. यामुळे, रविवारी वारकरी आणि सोमवारी शिवभक्त यांची एकच गर्दी त्र्यंबकेश्वर येथे होण्याची शक्यता आहे.