धुळे, नंदुरबारला सर्वाधिक निधी

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील निवडक पर्यटन स्थळांची निवड करत त्याच्या विकासासाठी प्रयत्नशील असलेल्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सरकार दरबारी पाठपुराव्याला यश आले आहे. या संदर्भात झालेल्या बैठकीत नाशिक विभागात जिल्हानिहाय ३३६८.८७ लाख रुपये मंजूर करण्यात आले. त्यातील ९३०.०५ लाख रुपये वितरीतही करण्यात आले आहे.

निधी वाटपात राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल पालक असलेल्या नंदुरबार आणि धुळ्यातील त्यांच्या दोंडाईचा या मतदारसंघास झुकते माप मिळाल्याचे दिसून येते. नाशिकला तुलनेत कमी निधी प्राप्त झाला आहे.

पर्यटनमंत्री उत्तर महाराष्ट्राचे असल्याने उत्तर महाराष्ट्रातील पर्यटन विकासाशी निगडीत विषय मार्गी लागण्यास सुरूवात झाली आहे. या संदर्भात रावल यांच्या अध्यक्षतेखाली व राज्यमंत्री मदन येरावार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. त्यावेळी विविध प्रस्तावांना मान्यता देण्यात आली. प्रकल्पनिहाय मंजूर झालेल्या निधीचा विचार केल्यास नाशिक जिल्ह्यासाठी  (५० लाख), अहमदनगर (दोन कोटी ८५ लाख), जळगाव (एक कोटी), धुळे (एक कोटी ८० लाख), नंदुरबार (तीन कोटी १५ लाख) रुपये मंजूर झाले आहेत. पर्यटनमंत्र्यांनी आपल्या धुळे जिल्ह्यासह नंदुरबारच्या पर्यटन विकासाकडे प्राधान्यक्रमाने लक्ष दिल्याचे लक्षात येते. विकास कामांच्या यादीत नाशिकच्या इगतपुरी परिसरातील कपिलधारा कावनई, देवळा येथील दुर्गा माता मंदिर, अहमदनगर येथील भुईकोट किल्ला, हजरत मिरावली पहाड, श्री क्षेत्र देवगड येथील यात्री निवास बांधकाम, निघोज ते निघोज कुंड रस्ता, सुरला बेट, नेवासासह अन्य कामे, जळगाव येथील पाचोरा नगरपालिका हद्दीत श्रीराम मंदिर परिसराचा विकास, धुळे येथील काही निवडक कामे, नंदुरबार येथे काळमदेव देवस्थान, प्रकाशा येथील संगमेश्वर मंदिराचा विकास आदी प्रस्तावांना हिरवा कंदिल दाखविला आहे.

उपरोक्त कामांसाठी जिल्हानिहाय निधी मंजूर झाला असून काही रक्कम वितरीत करण्यात आली आहे. रावल यांचे कार्यक्षेत्र असलेल्या धुळे, नंदुरबार येथे पर्यटन विषयक कामे दाखवत नगरपालिकेच्या अनेक कामांचा समावेश करण्यात आला आहे. दोंडाईचा नगरपालिका हद्दीत बाहेरगावहून येणाऱ्या पर्यटकांसाठी विशेष सोयी सुविधांचा वर्षांव झाला आहे. रस्ता तयार करणे, जलतरण तलाव, बगीचा, पथदीप, रंगीत-संगीत कारंजे, साहसी खेळ, पथदीप, पुरातन वास्तुंचे नुतनीकरण आदींचा समावेश आहे. जिल्हानिहाय मंजूर झालेली कामे एका बाजुला आणि एकटय़ा दोंडाईचासाठी मंजूर झालेली कामे दुसरीकडे अशी स्थिती आहे.

दोंडाईचा शहरात तीन कोटी ९४ लाख रुपयांची उपरोक्त कामे मंजूर करण्यात आली. त्यातील निम्मी रक्कमही तातडीने उपलब्ध करण्यात आली आहे. नंदुरबारचे पालकत्व रावल यांच्याकडे आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील मोड चैतन्यश्वर महादेव, गजानन महाराज, केदारेश्वर, काळमदेव मंदिराशी निगडीत विविध कामांसह रावलापारणी ऐतिहासिक पर्यटन स्थळ विकास आणि हजरत दर्गा मंडप उभारणी अशा एकूण १३ कोटी ६६ लाखांची कामे मंजूर झाली आहेत. त्यातील तीन कोटी १५ लाखाची रक्कमही उपलब्ध करण्यात आली. याचा विचार करता नाशिक जिल्ह्यात एकूण एक कोटी ४३ लाख रुपयांच्या प्रस्तावांना मान्यता देताना ५० लाखाचा निधी देण्यात आला आहे.