नाशिकमधील दिंडोरी येथे बांधकाम सुरु असलेल्या साईटवर जेसीबीचा धक्का लागून दीड वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची घटना घडली.बांधकाम साईटवर मोलमजुरी करणा-या जोडप्याने बाळ शांत झोपावे म्हणून तिला खडीवर झोपवले असताना ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
दिंडोरी तालुक्यातील मोहाडी शिवारातील सह्याद्री फार्मच्या आवारात बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी मोलमजुरी करणारा मोलचंद रावत व त्याची पत्नी यांनी कामावर येताना त्यांची मुलगी शिवानीला सोबत घेऊन आले होते. कामाच्या ठिकाणी झोळीमध्ये या चिमुरडीला झोपवले जात. तसेच उर्वरित वेळेत ही चिमुरडी फार्मच्या आवारात मोकळ्या जागेत खेळायची. बुधवारी दुपारी त्यांनी वाळू व खडीच्या ढिगा-यावर शिवानीला झोपवले होते. उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून तिच्या अंगावर तिच्या आईने सिमेंटची गोणी टाकली आणि ती कामाला लागली. त्याचठिकाणी खड्डा खोदण्यासाठी आलेल्या जेसीबीच्या चाकाचा धक्का चिमुरडीला बसला. यात त्या चिमुरडीचा मृत्यू झाला. जेसीबी वाहन चालक रेशम साव (२३, रा. झारखंड) हा वाहन मागे-पुढे करत असताना ही घटना घडली. या प्रकरणी वाहनचालक साव याच्याविरूध्द दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप वाहनचालकाला अटक करण्यात आलेली नाही.