नाशिक – देवळाली कॅम्प लष्करी भागालगतच्या शिंगवे बहुला गावात गुरुवारी हँग ग्लायडर घरावर कोसळून लष्करी जवान जखमी झाला. या दुर्घटनेत जिवितहानी झाली नाही. लष्करी पथकाने तातडीने धाव घेत जखमी जवानास लष्करी रुग्णालयात दाखल केले. हँग ग्लायडिंग करताना यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्यापासून ते नियंत्रण सुटल्याने ते भरकल्यापर्यंतची चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती.

देवळाली कॅम्प येथे तोफखाना दलाचे मुख्य प्रशिक्षण केंद्र आहे. या ठिकाणी लष्करी अधिकारी व जवानांना तोफांच्या सरावाचे प्रशिक्षण दिले जाते. लष्करी क्षेत्रात ग्लायडिंगचेही प्रशिक्षण दिले जाते. शिंगवे बहुला गावालगत लष्कराचे ग्लायडिंग प्रशिक्षण केंद्र आहे. गुरुवारी नेहमीप्रमाणे जवानांच्या नियमित सरावावेळी ही दुर्घटना घडली. सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास ग्लायडर शिंगवेबहुला गावातील नागरी वसाहतीत एका घरावर कोसळले. आकाशातून ते जसे जमिनीजवळ आले, तसे ते जवानाच्या नियंत्रणाबाहेर गेल्याचे स्थानिकांनी पाहिले होते. लष्करी क्षेत्रातील मैदानावर न उतरता ते गावाकडे भरकटले आणि नंतर कौसाबाई चव्हाण यांच्या घरावर कोसळले.

ग्लायडर भरकटल्याचे लष्करी अधिकारी व जवानांच्या आधीच लक्षात आले होते. त्यांची पथके अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी धडकली. जवानांनी त्वरित छतावर जाऊन ग्लायडरसह जखमी जवानाला खाली उतरवले. जखमीला लगेच देवळालीच्या छावणी लष्करी रुग्णालयात रवाना करण्यात आले.

या दुर्घटनेत ग्लायडरसह घरावरील पत्र्याचे नुकसान झाले. छताचे फारसे नुकसान झालेेले नव्हते. त्यामुळे ज्या घरावर ते कोसळले, त्यांनी आपली काहीही तक्रार नसल्याचे प्रसारमाध्यमांना सांगितले. या परिसरात पॅरा व हँग ग्लायडिंग प्रशिक्षणावेळी अशा घटना घडण्याची शक्यता असते. त्यामुळे जवानांचे पथक नेहमीच सतर्क असते. घराचे पत्रे बदलून देण्याची तयारी लष्करी पथकाने दर्शविली.

जखमी झालेला जवान नाईड राईड्स युनिटशी संबंधित असल्याचे सांगण्यात आले. तर बचाव पथकात लष्करी अधिकाऱ्यांसह विंड राईडरचे जवानांचा समावेश होता. देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत जखमी झालेल्या जवानाच्या नावाची स्पष्टता सायंकाळपर्यंत झालेली नव्हती.

पॅरा आणि हँग ग्लायडिंगमध्ये फरक काय ?

लष्कराच्या विशेष तुकडीतील अधिकारी, जवानांना आकाशातून पॅराशूट अर्थात हवाई छत्रीतून जमिनीवर उतरण्याचे प्रशिक्षण दिले जाते. आयताकृती आकाराचे पॅराशूट पॅरा ग्लायडिंग तर मोठ्या त्रिकोणासारख्या हलक्या धातूच्या पट्टीतील ग्लायडर हे हँग ग्लायडिंग म्हणून ओळखले जाते. यातील फरक म्हणजे पॅराशूट हलक्या व टिकाऊ कापडापासून तयार केलेले असते. चालक पॅराशूटच्या खालील भागात लटकलेला असतो. तर हँग ग्लायडिंगमध्ये ग्लायडर अर्थात पंख छातूच्या पट्टीवर विशिष्ठ मजूबत कापडाने तयार केलेले असते. उड्डाण करताना चालकाचे शरीर आडवे, तोंड खालच्या बाजुला असते.