नाशिक – ग्रामीण भागाप्रमाणे शहरात बिबट्यांचा वाढता शिरकाव, हल्ले नाशिककरांना भयग्रस्त करणारे ठरत आहेत. नाशिकमध्ये बिबट्या-मानव संघर्ष तीव्र झाला आहे. मका, उसाची शेती आणि सहजपणे उपलब्ध होणारे अन्न यामुळे नागरी भागालगत बिबट्यांचा अधिवास तयार झाल्याचे वन विभागाचे निरीक्षण आहे. यामुळे ग्रामीण भागाप्रमाणे शहरात ते मुक्तपणे संचार करू लागल्याचे चित्र आहे. सातपूर परिमंडळातील गंगापूर शिवारात सुनील पाटील यांच्या शेतात गुरुवारी बिबट्या जेरबंद झाला होता. एक ते दीड वर्षांचा हा नर बिबट्या आहे. दुसऱ्याच दिवशी वनविहार कॉलनीलगतच्या महात्मा नगरमधील गुरुकूल कॉलनी परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला. बिबट्याच्या हल्ल्यात सहा जण जखमी झाले. यात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी धडपड करणाऱ्या दोन वनरक्षकांचा समावेश आहे.
शहर परिसरात बिबट्याच्या शिरकावाची ही पहिली घटना नाही. शुक्रवारी ज्या भागात बिबट्याने धुमाकूळ घातला, तशीच घटना १० वर्षांपूर्वी याच परिसरातील महात्मानगरमध्ये घडली होती. महात्मानगर जलकुंभालगतच्या पुण्यस्मृती अपार्टमेंटमध्ये बिबट्या शिरला होता. त्याला पकडण्यासाठी वन विभागाला बरीच कसरत करावी लागली होती, असे या भागातील रहिवासी तथा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी सांगितले. मागील सहा ते सात वर्षात बिबट्याने अनेकदा थेट शहरात शिरकाव केलेला आहे. काही वेळा त्याच्या हल्ल्यात अनेकांना जखमी व्हावे लागले. २०१९ मध्ये सावरकरनगर भागात बिबट्याने चार जणांना जखमी केले होते. यात माजी नगरसेवक व पत्रकारांचाही समावेश होता. २०२० वर्षात वेगवेगळ्या भागात बिबट्याचे दोन हल्ले झाले. कॉलेजरोड भागातील पहिल्या घटनेत महिला जखमी झाली होती. या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी इंदिरानगरमध्ये बिबट्याने दोघांवर हल्ला केला होता. २०२२ मध्ये नाशिकरोडच्या जयभवानी रस्त्यावर बिबट्याच्या हल्ल्यात एक ज्येष्ठ नागरिक जखमी झाला होता. गोविंदनगर भागात एका घरात बिबट्याने ठाण मांडले होते. गंगापूर रस्त्यावर यापूर्वी दोनवेळा, मखमलाबाद भागात बिबट्यांचे अनेकदा दर्शन घडते. पेठ रस्त्यावरील नामको रुग्णालय परिसरातही बिबट्या दिसला होता.
उपरोक्त काळात शहरालगतच्या विहितगाव, शिंदे पळले, दोंडवे गावासह लष्करी हद्दीलगतच्या गावांमध्ये बिबट्यांचे अनेक हल्ले झाले. यामध्ये लहानग्यांना प्राण गमवावे लागले. जानेवारी ते १४ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत बिबट्यांच्या हल्ल्यात जिल्ह्यात १० जणांचा मृत्यू झाला. अनेक जण जखमी झाल्याची नोंद आहे. सुमारे २० लाख लोकसंख्येच्या नाशिक शहरात बिबट्याचा मुक्त संचार चिंता वाढवणारा ठरला आहे.
