नाशिक महानगरपालिका स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे शिवाजी गांगुर्डे निवडून आले आहेत. महापौर, उपमहापौरपदानंतर स्थायी समिती सभापतीपदावर देखील पक्षाने वर्चस्व मिळवले आहे.

आज (शुक्रवारी) सकाळी ११ वाजता महापालिकेच्या स्थायी समिती कक्षात निवडणूकीस सुरवात झाली. अपर आयुक्त जोतिबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक पार पडली. भाजप व शिवसेनेतील या दोन्ही उमेदवारांना अर्ज माघारीसाठी १५ मिनिटांचा वेळ देण्यात आला. मात्र या कालावधीत दोन्ही उमेदवारांनी अर्ज माघारी न घेतल्याने निवडणुकीची पुढील प्रक्रिया सुरु झाली. स्थायी समितीच्या सदस्यांनी हात उंचावून दोन्ही सदस्यांना मतदान केले. यामध्ये भाजपचे उमेदवार शिवाजी गांगुर्डे यांना ९ मते मिळाली. तर शिवसेनेचे उमेदवार दत्तात्रय सूर्यवंशी यांना ७ मते मिळाली. सर्वाधिक मते मिळाल्याने भाजपचे शिवाजी गांगुर्डे हे स्थायी सभापती निवडून आले.

काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते असणाऱ्या शिवाजी गांगुर्डे यांनी यंदाच्या निवडणुकीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. नगरसेवकपदी निवडून आल्यानंतर स्थायी सभापती पदाचे पदही मिळाले यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, पक्ष हा निवडणुकीपुरता असतो. निवडणुकीनंतर जे कामकाज केले जाते ते सर्वसामान्यांसाठी महापालिकेच्या माध्यमातून कसे करता येईल यासाठी प्रत्येक नगरसेवकांनी प्रयत्न केले पाहिजे. पक्ष जरी बदलला असला तरी विचारसरणी ही एकच असते. विचारात बदल नसतो. पक्षाशी प्रामाणिक राहून काम केले पाहिजे. पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्षाचा नावलौकिक कसा वाढवता येईल यासाठी मी प्रयत्न करेन.