कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या वक्तव्यावरून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा उफाळून आला आहे. त्यात काल ( ६ डिसेंबर ) बेळगावत-हिगेबागवाडी येथील टोल नाक्यावर ‘कन्नड रक्षण वेदिका संघटने’कडून महाराष्ट्र नोंदणीच्या ट्रकची तोडफोड करण्यात आली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कर्नाटक सरकारला ४८ तासांचा इशारा दिला होता. “येत्या ४८ तासांत हे प्रकरण संपलं नाही, तर माझ्यासकट सर्वांना बेळगावात तेथील लोकांना धीर देण्यासाठी जावं लागेल. कर्नाटकाच्या सीमेवर हे घडत असेल तर लोकांचा उद्रेक होऊ शकतो. तो होऊ नये, हा आमचा प्रयत्न आहे,” असे शरद पवार यांनी म्हटलं होतं. यावरून नाशिकचे महंत अनिकेत शास्त्री महाराज यांनी प्रतिक्रिया देत शरद पवारांना सल्ला दिला आहे. हेही वाचा : शिंदे सरकारला ‘नामर्द’ म्हणणाऱ्या राऊतांना शंभूराज देसाईंचा इशारा; म्हणाले, “तोंड आवरावं, अन्यथा पुन्हा…” "चाळीस वर्षापासून शरद पवारांनी वेगवेगळी मंत्रीपदं भुषावली आहेत. त्यामुळे आतापर्यंत पवारांनी सीमावाद मिटवला नाही. त्यात ४८ तासांची मुदत देऊन पुन्हा महाराष्ट्र-कर्नाटक वाद चिघळवण्याचा प्रयत्न पवार करत आहेत. आज दत्त जयंती आहे. त्यामुळे लाखो भाविक कर्नाटकातील गाणगापूरला जातात. तिथे काय दुर्घटना घडली, तर संपूर्ण जबाबदारी शरद पवार यांची असेल," असं अनिकेत शास्त्री महाराज म्हणाले. हेही वाचा : “तुमचा रस्ता कोल्हापुरातून जातो हे लक्षात ठेवा,” धनंजय महाडिकांचा कर्नाटकच्या नागरिकांना इशारा; म्हणाले “अशी गुंडगिरी…” "कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद प्रश्न चर्चा करून सुटणार आहे. त्यामुळे शरद पवारांनी आज दत्त उपासना करावी. तसेच, या भानगडीत न पडता ४८ तासांचा अल्टिमेटम देण्याची वादग्रस्त विधाने पवारांनी करू नये. महाराष्ट्र-कर्नाटक आणि देशाची शांतता भंग पावू नये, अशी आशा व्यक्त करतो," असेही अनिकेत शास्त्री महाराज यांनी सांगितलं.