सार्वजनिक स्वच्छतागृहांची अवस्था दयनीय, महिलांची गैरसोय

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक : गर्दीच्या ठिकाणी महिलांना नैसर्गिक विधीची व्यवस्था व्हावी यासाठी ‘राईट टू पी’च्या माध्यमातून आवाज उठविल्यानंतर महानगरपालिकेला जाग आली. शहर परिसरातील हॉटेलमधील स्वच्छतागृह बाहेरील महिला नैसर्गिक विधीसाठी वापरू शकतात, असा निर्णय महापालिकेने घेऊन दोन वर्षांचा कालावधी उलटला. अद्याप ही योजना महिलांपर्यंत पोहोचलीच नाही ही वस्तुस्थिती आहे. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहांची वानवा असल्याने महिलांची गैरसोय होते. शहर परिसरात महापालिकेच्या वतीने काही ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृह उभारण्यात आली असली तरी त्यांची अवस्था अतिशय दयनीय आहे.

दुसरीकडे, महिला बाल कल्याण विभाग ‘स्वच्छता सर्वेक्षण’च्या नावाखाली सार्वजनिक स्वच्छतागृहाची जबाबदारी ही आरोग्य विभागावर ढकलत आहे. सार्वजनिक ठिकाणी असलेल्या स्वच्छतागृहांमध्ये घाणीचे साम्राज्य असून आडोशाचा वापर समाजकंटकांकडून वेगवेगळ्या कारणांसाठी केला जात आहे. तर मोकाट जनावरे या ठिकाणीही मुक्काम ठोकत असल्याने महिला अशा ठिकाणी जाण्याचे टाळत आहेत. या पार्श्वभूमीवर दोन वर्षांपूर्वी ‘मिळून साऱ्याजणी’ या संस्थेच्या वतीने शहर परिसरातील गर्दीची काही ठिकाणे निश्चित करण्यात आली. त्या ठिकाणी स्वच्छतागृह सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. महापालिका आणि संस्थेने महिला सुरक्षेच्या अनुषंगाने दिलेल्या अटी-शर्थीमुळे अद्याप हे काम पूर्ण झालेले नाही.

दुसरीकडे, कामाच्या वेळी बाहेर असताना महिलांची गैरसोय होऊ नये, त्यांना आरोग्यविषयक अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी महापालिकेने शहर परिसरातील हॉटेलांमधील स्वच्छतागृहे महिलांसाठी कायम खुली राहतील, असा निर्णय घेण्यात आला. या संदर्भात महापालिकेवर सामाजिक संस्था, नगरसेवकांकडून फलकाच्या माध्यमातून अभिनंदनाचा वर्षांवही झाला. या निर्णयाचे पुढे काय झाले, याविषयी महिला आणि बालकल्याण विभाग, नगरसेविका, महिला आमदार, सर्वसामान्य महिला अनभिज्ञ आहेत.

नैसर्गिक विधी वेळेत न झाल्याने महिलांमधील आरोग्यविषयक तक्रारींमध्ये वाढ होत असून मुत्राशयात संसर्ग, मूतखडा, ओटीपोटात सातत्याने दुखणे अशा तक्रारी उद्भवतात. दुसरीकडे, महिला आणि बालकल्याण विभाग आपली जबाबदारी ढकलत असून आरोग्य विभाग यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगते.

पैसे घ्या पण सुविधा द्या

नाशिकला बहुतांश सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहे नाहीत. मॉलही याला अपवाद नाहीत. पुरुषांचे यामुळे फारसे अडत नाही. ते कुठेही आडोसा जवळ करतात. मात्र आम्हा स्त्रियांची फारच केविलवाणी अवस्था होते. गावात, बाजारपेठेत खरेदी करत असताना बऱ्याचदा एकामागोमाग एक कामे करावी लागतात. दोन-चार तास गावात आलो तर अन्य काही कामे केली जातात. अशा वेळी फार पंचाईत होते. स्त्रिया मग आपल्या परीने पाणी न पिणे, द्रव्यपदार्थ न घेणे आदी उपाय करतात. त्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. उन्हाळ्याच्या दिवसांत तर शरीरातील पाणी कमी होऊन उन्हाळी लागते. पण बोलावे कोणाला? जी स्वच्छतागृहे आहेत ती गलिच्छ आहेत. ‘पे अ‍ॅण्ड पी’ची संकल्पना आणून स्वच्छ स्वच्छतागृहे आणली तर फार बरे होईल.

– चारुलता केतकर

लवकरच स्वच्छतागृहे महिलांना खुली

राईट टू पी अंतर्गत शहरातील हॉटेल महिलांना नैसर्गिक विधीसाठी खुली आहेत. मात्र किती महिलांनी याचा लाभ घेतला याविषयी माहिती नाही. आम्ही ‘स्वच्छ भारत सर्वेक्षण’अंतर्गत शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहे साफ करत महिलांसाठी खुली करीत आहोत. काही नव्याने स्वच्छतागृहे बांधण्यात येतील.

– डॉ. सुनील बुकाणे (महापालिका आरोग्य अधिकारी)

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik municipal administration indifferent over women toilets zws
First published on: 11-01-2020 at 02:48 IST