काही वर्षांपूर्वी निवडणुकीच्या काळात रिक्षा किंवा एखाद्या वाहनातून ‘ताई, माई, अक्का.. विचार करा पक्का..’चा नारा सातत्याने कानी पडत असे. पण गेल्या काही वर्षांत प्रचाराचे स्वरूप बदलले. निवडणूक प्रचारासाठी पत्रके, जाहिराती, मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी या पारंपरिकसह लघु संदेश व समाजमाध्यमांच्या वापराबरोबर उमेदवार आता आपला परिचय मतदाराला व्हावा, यासाठी गाण्यांचाही आधार घेत आहे. गाण्यांचा वापर करताना प्रतिस्पर्धी उमेदवार वा दुसऱ्या पक्षांवर चिखलफेक होणार नाही, याची काळजी घेतली जाते. खास उमेदवारासाठी निर्मिलेल्या प्रचार गाण्यांवर सध्या सैराट, शांताबाई, नवरी नटली, येड लागलंय आदींचा पगडा अधोरेखित होत आहे. त्यासाठी मोठा आर्थिक खर्चाची झळ सहन करावी लागत असल्याने केवळ आर्थिक बलदंड उमेदवार हा मार्ग धुंडाळत आहे.

महापालिका निवडणुकीसाठी सर्वच प्रभागांत बहुरंगी लढत होत असताना प्रचारात आपण मागे राहू नये यासाठी उमेदवारांकडून नवमाध्यमांसह प्रसिद्धीच्या विविध तंत्रांचा अवलंब होत आहे. त्यात प्रामुख्याने उमेदवारांचा जोर ‘गीत’ प्रचारावर राहिला आहे. प्रचारासाठी अतिशय कमी कालावधी असल्याने कमी वेळात अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वच उमेदवार कामाला लागले.

स्थानिक पातळीवरील संगीतकार, गीतकार, वाद्यवृंद यांच्या गाठीभेठी घेत उमेदवार खास फर्माईशी करत आहेत. त्यात विद्यमान नगरसेवक असतील तर प्रभागात केलेली कामे, पक्षाच्या विविध योजना, भविष्यात कोणते उपक्रम राबविण्यात येणार आहेत याची माहिती गीताद्वारे देण्यात येते. काही वेळा उमेदवारांचा वैयक्तिक तपशिलाचे काही संदर्भ घेत गीतांची मांडणी होते. गीतासाठी संगीत देताना कोणते वाद्य, सामग्री वापरली जाते, चाल कोणती नवी की जुन्याच गाण्याची, गायक स्थानिक की बाहेरून खास आमंत्रित केलेले यावर गाण्याचा खर्च अवलंबून असतो.  यासाठी १० हजार रुपयांपासून एक लाख रुपयांपर्यंत मानधन संगीतकाराला दिले जाते. मात्र हा खर्च निवडणूक आयोगाकडे सादर करावा लागेल, यासाठी सर्व व्यवहार रोखीत होतात. नाममात्र रक्कम ही धनादेशाद्वारे दिली जाते.

दरम्यान, गीतकारांकडून गीत लेखन करताना एखाद्या पक्षांची, उमेदवारांवर आरोप, चिखलफेक होणार नाही, याची काळजी घेतली जाते. तसे शब्द मांडणे व संगीतकारकडून तशी चाल येणे हे आव्हानात्मक काम असले तरी यामुळे भविष्यात कोणी अब्रुनुकसानीचा दावा टाकू शकतो. या शक्यतेने केवळ इच्छुक उमेदवार, तो पक्षांकडून अधिकृत असेल किंवा अपक्ष उमेदवार असेल तर त्याच्या चिन्हांचा उल्लेख करत त्याचे महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न होतो. या धाटणीच्या प्रचारापासून अपक्ष उमेदवारांनी अंतर राखले आहे.

अशी होते गाण्याची मांडणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गीतकाराकडून एखादे गीत लिहून आणले गेले की, त्याला चाल देताना खास ‘ट्रॅक’ असेल असे नाही. गीताचे बोल समजावे, पण ते मतदारांच्या लक्षात राहावे, उमेदवाराचा परिचय व्हावा यासाठी त्याचे नाव, प्रभाग क्रमांक याची उद्घोषणा गीताच्या अंतरात होत राहते. अवघ्या ६० ते १८० सेकंदांचे गीत तयार करण्यासाठी गीतकार, संगीतकार खूप काही करतात असे नाही. कारण उमेदवारास घाई असते. काही दिवसच हाती असल्याने सकाळी गीत संध्याकाळी संगीत दिलेली ध्वनिमुद्रिका हातात हवी अशी उमेदवाराची मानसिकता असल्याने शब्दातील बदल, वाक्य अलीकडे, पलीकडे होत त्या गीताची मांडणी होते.