नाशिकला ‘स्मार्ट’ बनविण्यासाठी नवनवीन संकल्पनांची मांदियाळी सुरू असली तरी शहराचे वेगळेपण अधोरेखित करणाऱ्या अनोख्या उपक्रमांकडे शहरवासीयांप्रमाणे महापालिकेचे दुर्लक्ष झाल्याचे अधोरेखित होत आहे. केंद्र सरकारच्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेसाठी नवनवीन संकल्पना सुचविणाऱ्यांसाठी महापालिकेने खास स्पर्धादेखील जाहीर केली आहे. तथापि, शहर व परिसरात असे जे वेगळे प्रकल्प आधीपासून अस्तित्वात आहे, त्याचा नागरिकांप्रमाणे पालिकेला विसर पडला. वैद्यकशास्त्राचा इतिहास उलगडणारे आरोग्य विद्यापीठाचे वस्तू संग्रहालय हे त्यापैकीच एक. हाकेच्या अंतरावर असणाऱ्या या संग्रहालयाकडे काही शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा अपवाद वगळता फारसे कोणी फिरकत नाही. शहराला स्मार्ट बनविण्यासाठी नव्या संकल्पना धुंडाळणाऱ्या महापालिकेलाही त्याचे महत्त्व लक्षात आलेले नाही.

वैद्यकशास्त्राच्या विविध शाखांच्या अभ्यासासाठी व भविष्यातील संशोधनाची दिशा ठरविण्यासाठी भूतकाळाचा अभ्यास, संदर्भ विशेष उपयुक्त ठरतात आणि त्यासाठी वस्तुसंग्रहालय महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात, हे लक्षात घेऊन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने या संग्रहालयाची संकल्पना मांडली. वैद्यकीय वस्तुसंग्रहालय साधारणत: सहा वर्षांपूर्वी प्रत्यक्षात आले. संग्रहालयाचे वैशिष्टय़े म्हणजे पौराणिक काळातील संदर्भापासून सध्य स्थितीतील संशोधनापर्यंतचा धावता वेध या ठिकाणी प्रतिकृती, माहिती फलक, शिल्प आदींच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींवर पुण्याच्या ससून रुग्णालयात १९२४ मध्ये अ‍ॅपेंडिक्सची जी शस्त्रक्रिया झाली त्याचा देखावा उभारण्यात आला आहे. विद्युतप्रवाह बंद असताना मोठय़ा डायरोमाद्वारे ही शस्त्रक्रिया सुरू असल्याचे दाखविण्यात आले. भारतीय नौसेनेच्या मुंबई येथील आयएनएस अश्विनीच्या स्कूल ऑफ मेडिकल असिस्टंटतर्फे युद्धनौका प्रतिकृती, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारातील बोटीची प्रतिकृती, ‘अग्रणींचे शिखर’ या अनोख्या शिल्पात वैद्यकशास्त्र जनक हिप्पोक्रॅटिस, भारतीय आद्यशास्त्र चिकित्सक शल्यविशारद महर्षी सुश्रुत, होमिओपॅथीचे जनक सॅम्युअल हॅनिमन, युनानीचे अविसिन्न आदींचा समावेश आहे. ही माहिती सर्वाना समजावी म्हणून फलक लावण्यात आले आहे.

काही ठिकाणी आकृती, प्रतिमांच्या माध्यमातून विषय समजावून देण्यात आला आहे. याशिवाय सर्व पॅथीची माहिती, अवकाशातील गमतीजमती यासह अन्य काही माहिती शिल्प, फलक या माध्यमातून उपलब्ध करून दिली. वैद्यकीय क्षेत्रातील माहितीचा हा खजिना सुरुवातीपासून सर्वासाठी खुला करण्यात आला. मात्र, त्यास नाशिककरांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. पाच रुपये इतके नाममात्र शुल्क आकारले जाते. पण, त्याकडे शहरवासीयांनी पाठ फिरविली. माहितीचा खजिना सर्वांपर्यंत पोहोचावा यासाठी विद्यापीठ प्रयत्न करीत आहे. जिल्हा परिषद व महापालिकेच्या शाळा, आश्रम शाळा तसेच अकरावीच्या विद्यार्थ्यांना निमंत्रित केले जाते. संबंधितांना माहिती देण्यासाठी दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यार्थी स्वयंस्फूर्तीने शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली माहिती जमविण्याचा प्रयत्न करतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यातील या अनोख्या संग्रहालयाकडे विद्यार्थी वगळता नागरिकांचे दुर्लक्ष झाले आहे. ‘स्मार्ट सिटी’च्या यादीत नाशिकचा समावेश झाला आहे. शहर खऱ्या अर्थाने ‘स्मार्ट’ व्हावे, यासाठी पालिका आयुक्तांसह सर्व यंत्रणा कामाला लागली आहे. शैक्षणिक वैभवात भर घालणाऱ्या विद्यापीठातील या संग्रहालयाकडे महापालिकेने कानाडोळा केला आहे.