नाशिक : महानगरपालिकेने काही प्रभागांच्या सीमांकनात आवश्यकतेनुसार काही बदल करून प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा नगरविकास विभागाला सादर केला. मागील निवडणुकीप्रमाणे यंदा २९ प्रभाग चार सदस्यीय तर दोन प्रभाग तीन सदस्यीय असतील. एकूण ३१ प्रभागात एकूण १२२ जागा राहणार आहेत. जुन्या प्रभागात काही बदल झाले का, याची उत्सुकता माजी नगरसेवकांसह इच्छुकांना आहे.
चार सदस्यीय प्रभाग रचना कोणाला फायदेशीर ठरणार, याबद्दल राजकीय वर्तुळात तर्कवितर्क व्यक्त होत आहेत. राज्य निवडणूक आयोगाने दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगूल वाजणार असल्याचे जाहीर केल्याने सर्वपक्ष सक्रिय झाले आहेत. गतवेळी महापालिकेत ६६ जागा मिळवून भाजपने एकहाती सत्ता मिळवली होती. तर ३५ जागा मिळवणाऱ्या एकसंघ शिवसेनेकडे विरोधी पक्षनेतेपद होते. राष्ट्रवादी आणि काँग्रेस प्रत्येकी सहा, मनसे पाच आणि अपक्ष चार नगरसेवक असे बलाबल होते. मधल्या काळात अनेक घडामोडी घडल्या.
एकसंघ शिवसेना आणि राष्ट्रवादी दुभंगल्याने स्थानिक पातळीवरील समीकरणे बदलली. शिवसेना ठाकरे गटातील अनेक माजी नगरसेवकांना सत्ताधारी भाजप व शिवसेना शिंदे गटाने आपल्याकडे खेचून घेतले. राज्यात भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे तिन्ही पक्ष एकत्रितपणे सत्तेत आहेत. यातील भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची जय्यत तयारी पाहता एकत्रितपणे लढण्याची शक्यता नाही. महाविकास आघाडीत मनसेचा समावेश होईल की नाही, याबद्दल उत्सुकता आहे. प्रभागनिहाय समीकरणे लक्षात घेऊन राजकीय पक्षांनी चालविलेल्या तयारीला आता अधिक वेग मिळणार आहे.
महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारुप प्रभाग रचना आराखडा नगरविकास विभागाला सादर करण्यात आला. ३१ प्रभागात एकूण १२२ सदस्य असतील. यातील २९ प्रभाग चार सदस्यीय तर दोन प्रभाग तीन सदस्यीय राहतील. जिथे आवश्यकता आहे, त्या प्रभागांच्या सीमांकनात काही बदल करण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.
आरक्षण मागील निवडणुकीप्रमाणेच
आरक्षण गतवेळप्रमाणे राहणार आहे. त्यात कुठलाही बदल झालेला नाही. खुल्या गटासाठी ६२, ओसीबी संवर्गासाठी ३३, अनुसूचित जाती प्रवर्गासाठी १८ आणि नऊ जागा अनुसूचीत जमातीसाठी आरक्षित असतील. एकूण जागांपैकी निम्म्या म्हणजे ६१ जागा महिलांसाठी राखीव राहणार आहेत. ओबीसी आरक्षण सोडत पद्धतीने काढले जाणार असल्याचे निवडणूक आयुक्तांनी म्हटले आहे.
ऑक्टोबरच्या प्रारंभी अंतिम प्रभाग रचना
नगर विकास विभागाकडून महानगरपालिकेचा प्रारूप प्रभाग रचना आराखडा राज्य निवडणूक आयोगाकडे सादर होईल. निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेला मान्यता दिल्यानंतर महानगरपालिका प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करेल. यावर हरकती व सूचनांवर सुनावणीची प्रक्रिया पार पडेल. यानंतर अंतिम केलेला प्रभाग रचना आराखडा नगरविकास व नंतर निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी सादर होणार आहे. आयोगाकडून प्रभाग रचनेला मान्यता मिळाल्यानंतर अंतिम प्रभाग रचना महापालिेकेकडून जाहीर केली जाईल.