नाशिक : माहेरून पैसे आणावेत, या मागणीसाठी विवाहितेस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्या प्रकरणात पाच दिवस उलटूनही संशयितांविरुध्द कारवाई न झाल्याने संबधितांना तत्काळ अटक करण्याची मागणी होत आहे. पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर शहरातील भक्ती गुजराथी प्रकरण चर्चेत आले आहे.

आनंदवली येथील सिरीन मिडोज भागात राहणाऱ्या भक्ती अथर्व गुजराथी (३३, रा. फ्लॅट न.१०१ इ विंग, सम्राट ट्रॉपिकोना) या विवाहितेने सोमवारी राहत्या घरातील शयनकक्षात पंख्यास ओढणी बांधून गळफास घेतला. याप्रकरणी भक्तीचे वडील दिलीप माडीवाले (६१, रा.लक्ष्मीनारायण रोड, येवला) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन भक्तीचे पती अथर्व गुजराथी, सासरे योगेश गुजराथी, सासू मधुरा गुजराथी आदींविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भक्ती आणि अथर्व यांच्यात २०१७ मध्ये दोन्ही कुटूंबियांच्या संमतीने प्रेमविवाह झाला होता. आईवडिलांसमवेत नवीन पंडित कॉलनीत राहणारे गुजराथी दाम्पत्य मूल झाल्यानंतर दिड वर्षांपासून आनंदवली येथील सम्राट ट्रॉपिकोना सोसायटीत राहत होते. दारुचे व्यसन जडल्याने अथर्व पत्नीचा छळ करु लागला होता. लग्नात मानपान दिला नाही. माहेरून पैसे आणावेत या मागणीसाठी अथर्वकडून भक्तीस मारहाण होत होती. हा वाद नातेवाईकांकरवी मिटविण्यात आला होता. माहेरी गेलेल्या भक्तीस पतीच्या विनवणीनंतर सासरी पाठविण्यात आले होते. परंतु, काही दिवसांनी पुन्हा अथर्वने त्रास देणे सुरू केले. घटनेच्या आदल्या दिवशी भक्तीने याबाबत पुणेस्थित भावाकडे भ्रमणध्वनीवर संदेश पाठवत तक्रार केली होती. हे अथर्वला समजल्याने आणि सासरच्या मंडळींनी मानसिक, शारीरिक शारिरीक छळ केल्याने भक्तीने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप माडीवाले यांनी तक्रारीत केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण राज्यात गाजत असताना पाच दिवस उलटूनही भक्ती गुजराथी प्रकरणात संशयित पोलिसांच्या हाती लागत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.