नाशिक – लेव्ही वसुलीच्या वादातून सलग आठ दिवस ठप्प असणारे कांदा लिलाव लासलगाव बाजार समितीत शुक्रवारी सकाळपासून सुरू झाले. पहिल्याच दिवशी सकाळच्या सत्रात १६ हजार क्विंटलची आवक होऊन त्यास सरासरी दीड हजार रुपये भाव मिळाला. इतर बाजार समित्यांमध्ये मात्र कृषिमालाचे व्यवहार अद्याप सुरू झालेले नसल्याने शेतकऱ्यांची कोंडी कायम आहे.

बाजार समितीत कृषि मालाच्या खरेदी-विक्रीवेळी आकारल्या जाणाऱ्या हमाली, तोलाई, वाराई वसुलीचा वाद अनेक वर्षांपासून सुरू आहे. थकीत लेव्हीच्या वसुलीसाठी माथाडी कामगार मंडळाने १२०० ते १४०० व्यापाऱ्यांना नोटीसा काढल्या होत्या. या विरोधात व्यापारी संघटनेने न्यायालयात अपिल करीत स्थगिती मिळवली. नंतर व्यापाऱ्यांनी हमाली, तोलाई कपात करायची नाही, त्यामुळे लेव्हीचा प्रश्न उद्भवणार नसल्याचे निश्चित केले. यामुळे माथाडी-मापारी दैनंदिन कामकाजातून बाजुला झाले. जवळपास १५ बाजार समित्यांनी लिलाव बंद ठेवण्याचे जाहीर केले. यामुळे आठ दिवसांपासून कोट्यवधींचे व्यवहार थंडावले. यावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी बोलाविलेली बैठकही निष्फळ ठरली होती. प्रचलित पद्धतीने हमाली, तोलाई आणि वाराई कपात करावी, हा निकष ठेवत कृषिमालाचे लिलाव सुरू करण्याची सूचना शर्मा यांनी केली होती. या घडामोडीनंतर लासलगाव बाजार समिती संचालकांची बैठक झाली. त्यात प्रचलित पद्धतीचा अवलंब करून लिलाव सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार शुक्रवारपासून लासलगाव समितीत लिलाव सुरू सुरू झाल्याची माहिती सचिव नरेंद्र वाढवणे यांनी दिली.

हेही वाचा – मालेगावात नमाज पठणवेळी पॅलेस्टाईनचा झेंडा फडकला

सकाळच्या सत्रात कांद्याची ५५० वाहने (अंदाजे १६ हजार क्विंटल) आवक झाली. त्यास किमान एक हजार ते कमाल तीन हजार आणि सरासरी दीड हजार रुपये भाव मिळाला. लिलावात ४० व्यापारी सहभागी झाले आहेत. लासलगाव बाजार समितीत एकूण २२९ व्यापारी आहेत. लेव्ही कपातीला नकार देणारे ४० ते ५० प्रस्थापित व्यापारी लिलाव प्रक्रियेत सहभागी झाले नाहीत. सहभागी झालेल्या व्यापाऱ्यांमध्ये काही विंचूर उपबाजारातील आणि काही नवीन व्यापारी असल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले.

हेही वाचा – महायुतीच्या बैठकीत नाशिकचा तिढा सुटेल; छगन भुजबळ यांना विश्वास

शेतकऱ्यांचे हित विचारात घेत व्यापारी प्रचलित पद्धतीने सहभागी न झाल्यास जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेने बाजार समित्यांना पर्यायी व्यवस्था उभारण्याची सूचना केली आहे. व्यापारी सहभागी न झाल्यास परवाना रद्द करण्याची तयारी करण्यात आली आहे. ज्या व्यापाऱ्यांनी परवान्यासाठी बाजार समितीकडे मागणी केली आहे, त्यांना तत्काळ अनुज्ञाप्ती ( संमती) देण्यात येणार आहे. कांदा व्यापाऱ्यावर ठराविक व्यापाऱ्यांची सद्दी आहे. लेव्हीच्या प्रश्नावरून त्यांनी शेतकऱ्यांना वेठीस धरल्याची तक्रार होत आहे. लासलगाव बाजार समितीत काही व्यापाऱ्यांच्या सोबतीने लिलाव सुरू झाले. तशीच कार्यपद्धती अन्य बाजार समित्यांमध्ये अवलंबून कृषिमालाचे लिलाव पूर्ववत करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. सलग आठ दिवस लिलाव बंद राहिल्याने शेतकरी वेठीस धरले गेले आहेत.