नाशिक : शहराचा चौफेर विस्तार पाहता वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या यामुळे वाहतूक कोंडी ही अनेकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. शहरातील पाथर्डी फाटा, नाशिकरोड सह अन्य भागात कोंडीमुळे वाहनचालक वैतागले असताना द्वारका परिसरातील वाहतूक कोंडी ही पोलीस तसेच वाहनचालकांच्या संयमाची परीक्षा घेते. या पार्श्वभूमीवर वाहतूक विभागाच्या वतीने निव्वळ द्वारकासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
द्वारका चौकात होणारी वाहतूक कोंडी हा अनेक वर्षांपासून न सुटलेला विषय आहे. नाशिक-पुणे आणि मुंबई-आग्रा या दोन महामार्गांचा संगम या चौफुलीवर होतो. त्यामुळे या ठिकाणी दिवसरात्र वाहनांची गर्दी असते. या ठिकाणची कोंडी फोडण्यासाठी वेळोवेळी अनेक उपाय करण्यात आले. परंतु, एकही उपाय यशस्वी झालेला नाही. वाहतूक कोंडीची समस्या पाहता या चौकाचा घेर कमी करण्यात आला. परंतु, त्यामुळे कोंडी सुटण्यास कोणतीही मदत झालेली नाही. अलिकडेच मंत्री छगन भुजबळ यांनी या परिसराची पाहणी करुन कोंडी होऊ नये, यासाठी काही सूचना केल्या होत्या.
पोलिसांनी आता व्दारका चौकातील वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी द्वारका चौकात वाहतूक नियमन करण्यासाठी यापूर्वी दोन सत्रात एक अधिकारी, नऊ अंमलदार यांची नेमणूक केली होती. आता वाहतूक, रहदारी नियमनासाठी द्वारका वाहतूक विभाग अशा स्वतंत्र पथकाची निर्मिती करण्यात येत आहे. या पथकात पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक, दोन उपनिरीक्षक, वाहतूक पोलीस अंमलदार ३० अशा मनुष्यबळाची व्यवस्था करण्यात आली आहे.
या ठिकाणी सकाळी आठ ते दुपारी दोन सत्रात एक अधिकारी आणि १० वाहतूक अंमलदार नियमितपणे वाहतूक नियमन करणार आहे. द्वारकासाठी प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक दिनकर कदम यांची नेमणुक करण्यात आली आहे. त्यांना सहायक निरीक्षक यतिन पाटील, उपनिरीक्षक शिंदे आणि इतरांची साथ मिळणार आहे. द्वारका चौकात नेमलेले अधिकारी आणि अंमलदार यांना वाहतूक, रहदारी नियमन करण्याविषयी सूचना करण्यात आल्या आहेत.