शहरातील कॉलेजरोड या उच्चभ्रु परिसरात स्पा व पार्लरच्या नावाखाली राजरोसपणे अनैतिक व्यवसाय सुरू असल्याचा प्रकार समोर आला. हॉलमार्ग चौकालगतच्या एक्झॉटीक स्पा अ‍ॅण्ड मसाज् पार्लरमध्ये बुधवारी दुपारी पोलिसांनी छापा टाकला. तेथून आठ मुली व पाच पुरूष अशा एकूण १३ जणांना ताब्यात घेण्यात आले. महत्वाची बाब म्हणजे, काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी याच स्पा व मसाज पार्लरविरोधात याच कारणास्तव कारवाई केली होती. पुढील काळातही स्पा चालकाने अनैतिक व्यवहार सुरू ठेवल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.

गेल्या काही वर्षांत शहरात स्पा व पार्लरची संख्या लक्षणीय वाढली आहे. काही ठिकाणी या नावाखाली भलतेच उद्योग सुरू असल्याची चर्चा होत असते. त्या अनुषंगाने पोलिसांनी संशयास्पद स्पा व पार्लरवर नजर ठेवली आहे. कॉलेजरोडच्या हॉलमार्ग चौकालगत भव्य व्यापारी संकुल आहे. या ठिकाणी एक्झॉटीक स्पा व मसाज पार्लर असून तिथे असेच काही प्रकार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याची खातरजमा बुधवारी करण्यात आली. नंतर दीड वाजेच्या सुमारास पोलीस पथकाने अकस्मात छापा टाकला तेव्हा हा सर्व प्रकार उघड झाला.

पोलिसांना पाहून पार्लरमध्ये एकच धावपळ उडाली. या कारवाईत युवती व पुरूषांसह एकूण १३ जणांना अटक करण्यात आली. संबंधित स्पा कोण चालवत होते, ही जागा भाडेतत्वावर घेतली गेली, की कोणाच्या स्वत:च्या मालकीची होती याचा उलगडा तपासात होणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. काही महिन्यांपूर्वी याच स्पा व पार्लरवर पोलिसांनी कारवाई केली होती. तरी देखील चालकाने पुन्हा तेच उद्योग करण्याचे धाडस दाखविल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. आता  पुन्हा या स्पा-पार्लरला सील ठोकण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकरणी पिटा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी दिली. दरम्यान, निवासी भाग व व्यापारी संकुलातील स्पा व मसाज् सेंटरच्या नावाखाली चाललेले हे उद्योग स्थानिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. काही महिन्यांपूर्वी सावरकरनगरमध्येही याच स्वरुपाची कारवाई केली गेली होती. एक्झॉटीक स्पा व मसाज पार्लर प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.